जि.प. शाळा सात दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:15 AM2019-01-05T00:15:10+5:302019-01-05T00:15:28+5:30
शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याने रेऊळगाव (ता. कन्नड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संतप्त ग्रामस्थांनी कुलूप ठोकल्यामुळे गत सात दिवसांपासून शाळा बंद आहे.
चिंचोली लिंबाजी : शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याने रेऊळगाव (ता. कन्नड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संतप्त ग्रामस्थांनी कुलूप ठोकल्यामुळे गत सात दिवसांपासून शाळा बंद आहे. मात्र, तब्बल सात दिवसांपासून शाळा बंद असतानाही शिक्षण विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने शाळेला भेट देऊन तोडगा काढण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे सध्या येथील शिक्षकांना चक्क शाळेबाहेरच आपले कर्तव्य बजवावे लागत आहे.
रेऊळगाव शाळेवर इयत्ता पहिले ते आठवीपर्यंत वर्ग असून, एकूण येथील विद्यार्थी संख्या २३७ आहे. या शाळेला शिक्षकांची ९ पदे मंजूर आहेत. मात्र, सात महिन्यांपासून २ सहशिक्षक, १ पदवीधर, तर मुख्याध्यापकाचे पदही रिक्त आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांचे रिक्त पदे त्वरित भरावे, अशी मागणी ग्रामस्थांनी, ग्रामशिक्षण समितीने गटशिक्षणधिकाºयांकडे वारंवार केली. मात्र, तरीही शाळेला शिक्षक मिळाले नाहीत. अखेर २९ डिसेंबर रोजी ग्रा.पं. सदस्य संजय गोरे, देऊबा ढेपले यांच्यासह ग्रामस्थांनी शाळेला दुसºयांदा कुलूप ठोकले होते. मात्र, तेव्हापासून एकाही अधिकाºयाने शाळेला भेट देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे सात दिवसांपासून शाळा बंद आहे. सध्या येथील शिक्षक चक्क शाळेबाहेर बसून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.
पालकांनी या प्रकाराबाबत रोष व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून सात महिन्यांपासून ग्रामस्थ व ग्राम शिक्षण समिती वारंवार शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवत आहे. मात्र, कुंभकर्णी झोपेत असलेल्या शिक्षण विभागाच्या एकाही अधिकाºयाला जाग आली नाही, त्यामुळे आम्ही दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू होऊन दीड महिना होत आला, तरी रिक्त जागा भरण्यात न आल्याने मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय झाले आहे. मे २०१८ मध्ये झालेल्या बदल्यांमध्ये येथे नियुक्त झालेल्या शिक्षकांनी वरिष्ठ अधिकाºयांची मर्जी सांभाळून काहींनी प्रतिनियुक्तीवर, तर काहींनी आपल्या सोयीनुसार शाळेतून काढता पाय घेतला. यामुळे येथे गेल्या सात महिन्यांपासून शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.
——-
ग्रामपंचयात सदस्य संजय गोरे म्हणाले, सात दिवसांपासून शाळा बंद असतानाही कन्नड शिक्षण विभागाचा एकही अधिकारी अद्याप या शाळेकडे फिरकलेला नाही. अधिकाºयांना विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहते. जोपर्यंत शाळेला शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. जि.प. सीईओ तसेच जिल्हाधिकाºयांनी दखल घेऊन त्वरित येथील वादावर तोडगा काढवा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.