जि.प. शाळांवर टंचाईचे संकट
By Admin | Published: March 4, 2016 11:33 PM2016-03-04T23:33:14+5:302016-03-04T23:37:00+5:30
परभणी : जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीटंचाईचा फटका जिल्हा परिषद शाळांनाही बसला आहे.
परभणी : जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीटंचाईचा फटका जिल्हा परिषद शाळांनाही बसला आहे. जिल्ह्यातील निम्म्या जि. प. शाळांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने मध्यान्ह भोजन योजनेवर परिणाम होत आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार १४८ प्राथमिक शाळा असून ३६६ खाजगी अनुदानित, ४५६ विना अनुदानित अशा १ हजार ९७१ शाळा आहेत. त्यापैकी शासकीय ९९४, खाजगी अनुदानित ३६६ तर ४५३ खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये युडायसनुसार पाणी उपलब्ध करुन दिलेले आहे. परंतु, जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका या शाळांनाही बसत आहे. जिल्ह्यातील पाणीपातळी खालावल्यामुळे शाळांमधील बोअर, हातपंप कोरडेठाक पडले आहेत. गावातच पाणीटंचाई निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनाही पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे शाळांमध्येही पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. किती शाळांना पाणीटंचाईचा फटका बसला याची आकडेवारी शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही़ शिवाय जिल्हा परिषद शाळांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वेगळा फंड नसल्याने कोणत्या फंडातून पाणी उपलब्ध करून द्यायचे? असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनास पडला आहे़ त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्यामार्फतच शाळांमध्ये पाणी उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईची भीषणता लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकर घेण्यासंदर्भातही जिल्हा शिक्षण विभागात चर्चा सुरू आहे़ (प्रतिनिधी)