जि.प. उर्दू शाळेत टवाळखोरांचा उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:17 AM2017-08-15T00:17:40+5:302017-08-15T00:17:40+5:30
वाळूज महानगर : वाळूज येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत गत दोन महिन्यांपासून टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, रविवारी रात्री काहींनी शाळेतील फर्निचरची नासधूस करीत तीन ड्यूल डेस्क बेंच जाळून टाकले
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वाळूज येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत गत दोन महिन्यांपासून टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, रविवारी रात्री काहींनी शाळेतील फर्निचरची नासधूस करीत तीन ड्यूल डेस्क बेंच जाळून टाकले. या घटनेमुळे विद्यार्थी व पालकांत असंतोषाचे वातावरण असून, संतप्त पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना चांगलेच धारेवर धरले.
रामराई रोडवर असलेल्या शाळेत पहिली ते दहावी पर्यंत ५७० विद्यार्थी आणि १७ शिक्षक आहेत. सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शिक्षक व विद्यार्थी शाळेत आले असता त्यांना शाळेतील तीन ड्यूल टेस्क (बेंच) जळालेल्या अवस्थेत दिसून आले. ही बाब सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांच्या लक्षात आल्यामुळे पालक व शिक्षकांनी शाळेची पाहणी केली असता त्यांना शाळेतील साहित्याची नासधूस करून बेंच जाळल्याचे दिसून आले.
या प्रकाराची माहिती मिळताच सरपंच सुभाष तुपे, जिल्हा परिषद सदस्य रामदास परोडकर, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, फौजदार सोनटक्के, शेख वलीभाई, सुलेमान पटेल,आलीम सरवर, माजी ग्रामपंचायत सदस्य अन्सारखाँ पठाण,, फय्याज कुरैशी, अश्पाक पटेल, असिफ शहा, अकील शेख, अफरोज पठाण, निजाम सय्यद, अविनाश गायकवाड, संतोष दळवी आदींनी शाळेला भेट देऊन माध्यमिकचे मुख्याध्यापक भीमराव पवार, प्राथमिकचे मुख्याध्यापक संपत साबळे, शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
पालकांनी शिक्षकांना धरले धारेवर
या शाळेकडे संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारीही लक्ष देत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. गत चार वर्षांपासून जुनीच शालेय व्यवस्थापन समिती कार्यरत असून, नवीन समिती नेमण्यास मुख्याध्यापक उदासीन असल्याची ओरड पालकांनी केली आहे. यावेळी संतप्त पालकांनी मुख्याध्यापक भीमराव पवार, संपत साबळे व शिक्षकांना चांगलेच धारेवर धरत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. याप्रसंगी मुख्याध्यापकांनी सारवासारव करीत शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी, तसेच सुरक्षारक्षक नेमण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले. नवीन शालेय समितीची स्थापनाही लवकर करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक संपत साबळे यांनी सांगितले.