वडवणी तालुक्यात शून्य टक्के चारा
By Admin | Published: May 5, 2016 12:08 AM2016-05-05T00:08:28+5:302016-05-05T00:13:31+5:30
वडवणी : तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी भयावह दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. तालुक्यातील पाण्याचे
वडवणी : तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी भयावह दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. तालुक्यातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने व भूर्गभातील पाणीपातळी खालवल्याने पाण्याच्या शोधात रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. नागरिकांच्या घशाला कोरड पडत असताना जनावरांना दुष्काळी परिस्थितीचा मोठा सामना करावा लागत आहे. एप्रिल अखेर तालुक्यात शून्य टक्के चारा असल्याने ग्रामीण भागातील जनावरांचा चारा प्रश्न गंभीर बनला आहे.
वडवणी तालुक्यात ६५ हजार ७६ जनावरे असून, गाय प्रवर्गात १८ हजार १८७ तर म्हैस प्रवर्गात ७ हजार ५६६, शेळ्या ११ हजार ४९३, तर मेंढ्या, घोडे, कोंबड्या, कुत्रे, डुकरे असे एकूण ७५ हजार ७५ एवढी जनावरे आहेत. तालुक्यातील दुभत्या जनावरांना हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे दुधव्यवसाय ही धोक्यात आहे.
तालुक्यात फक्त तीन ठिकाणी जनावरांच्या छावण्या आहेत. देवळा येथे लहान ८१ तर मोठे ११५३ असे १२३४ जनावरे असून, पुसरा येथील चारा छावणीत लहान ६४ तर मोठे ७२० असे एकूण ७८४ जनावरे आहेत. वडवणी शहरातील चारा छावणीत लहान ३२ व मोठे ८४४ अशी ८७६ जनावरे आहेत. शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे हतबल झाले असून, चारा प्रश्न व पाणीटंचाईचा सामना यामुळे शेतकरी जनावरांना कवडीमोल किंमतीत विक्री काढत आहेत.
तालुका कृषी अधिकारी बी. बी. बांगर म्हणाले की, तालुक्यातील चारा हा एप्रिल महिन्यात संपला असून, तालुक्यातील जनावरांना आता छावणीत चारा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. (वार्ताहर)
चाराप्रश्न गंभीर : २८९४ जनावरे छावणीत
वडवणी तालुक्यातील जनावरांचा चारा प्रश्न सोडविण्यासाठी ३ छावण्या उभारण्यात आल्या मात्र एकूण २५ हजार ७५३ मोठ्या जनावरांपैकी फक्त २ हजार ८९४ जनावरांचा छावणीत मुक्काम असून २२ हजार ८५९ जनावरांचा चारा प्रश्न गंभीर बनला आहे.