शोभायात्रेतून दिला ‘जिओ और जिने दो’ संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:10 AM2019-04-18T00:10:37+5:302019-04-18T00:13:46+5:30

भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त बुधवारी (दि.१७) निघालेल्या शोभायात्रेतून जैन समाजाने सर्वांना ‘जिओ और जिने दो’चा संदेश दिला. विविध भागांतील जैन मंदिर, धार्मिक पाठशाळांनी तयार केलेल्या चित्ररथांतील सजीव-निर्जीव देखाव्यांद्वारे जैन संस्कृती, सामाजिक कार्याची झलक पाहावयास मिळाली, तसेच दुष्काळ, सैनिकांचे बलिदान यासारख्या विषयांद्वारे वैचारिक जागृतीकरण्यात आली.

'Zoe and Zine Do' messages from the showbiz | शोभायात्रेतून दिला ‘जिओ और जिने दो’ संदेश

शोभायात्रेतून दिला ‘जिओ और जिने दो’ संदेश

googlenewsNext
ठळक मुद्दे भगवान महावीर जन्मोत्सव : शहराच्या विविध जैन मंदिर, धार्मिक पाठशाळांनी केली चित्ररथातून वैचारिक जागृती

औरंगाबाद : भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त बुधवारी (दि.१७) निघालेल्या शोभायात्रेतून जैन समाजाने सर्वांना ‘जिओ और जिने दो’चा संदेश दिला. विविध भागांतील जैन मंदिर, धार्मिक पाठशाळांनी तयार केलेल्या चित्ररथांतील सजीव-निर्जीव देखाव्यांद्वारे जैन संस्कृती, सामाजिक कार्याची झलक पाहावयास मिळाली, तसेच दुष्काळ, सैनिकांचे बलिदान यासारख्या विषयांद्वारे वैचारिक जागृतीकरण्यात आली.
सर्वाधिक चित्ररथ असतात ते महावीर जन्मोत्सवाच्या शोभायात्रेत, यंदाही याची प्रचीती सर्वांना आली. जैन इंजिनिअर्स सोसायटीच्या वतीने ‘जैन सिद्धांताद्वारे पर्यावरण पोषण’ हा सुंदर देखावा सादर करण्यात आला होता. सुराणानगरातील भगवान महावीर जिनालयतर्फे ‘जिओ और जिने दो’चा संदेश देण्यात आला. चिंतामणी कॉलनीतील चिंतामणी पार्श्वनाथ पाठशाळाने ‘जैनम जयतु शासनम’ या विषयावरील देखावा सादर केला होता. तेरापंथ सभा, महिला मंडळ, युवक परिषदच्या वतीने ‘स्वदेशी अपनाओ... देश बचाओ’ या देखाव्याने सर्वांना चिंतन करण्यास भाग पाडले. अग्रवाल दिगंबर जैन महिला मंडळ, नयी उमंग गर्ल्स ग्रुपने सजीव देखाव्यांद्वारे मोबाईल, टीव्हीचे दुष्परिणाम सांगून ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश दिला. महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटीतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘शीतल-जल’ उपक्रमाचे वाहन शोभायात्रेत आणले होते. उल्कानगरीतील सुमतिसागर पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ असा संदेश देणारा देखावा तयार केला होता. वेदांतनगरातील प्रभाकिरण मंडळाने ‘जैन धर्म एक संघटन’ व जैन युवती संघाने ‘जैन एकता अभियान’ हा एकजुटीचा संदेश देणारा देखावा तयार करून सर्वांची मने जिंकली. लूक अ‍ॅण्ड जैन ज्ञान धामच्या वतीने करण्यात आलेला ‘भगवान महावीर को संगमद्वारा एक रात में दिये गये २० उपसर्ग’ यावरील सजीव देखावा लक्षवेधी ठरला. उत्तमचंद ठोले दिगंबर जैन छात्रालयातर्फे देखाव्यातून ‘मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता राजाबाजार खंडेलवाल दिगंबर जैन महिला मंडळाच्या वतीने ‘पाणी वाचवा’ असा देखावा तयार करण्यात आला होता. महिला विविध गाणे गाऊन झाडे लावा, पाणी वाचविण्याचा संदेश देत होत्या. कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिराच्या वतीने ‘उन्हें याद करो जो घर न आये’ हा शहीद जवानांवरील देखावा सर्वांचे मन हेलावणारा ठरला. ‘साँसे हो रही हैं कम, आओ पेड़ लगाए हम’ या देखावानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भगवंतांच्या पालखी, रथांसमोर सर्व नतमस्तक
शोभायात्रेत शहरातील विविध भागांतील जैन मंदिरांतून भगवंतांची पालखी, रथ आणण्यात आले होते. भगवंतांवर जागोजागी पुष्पवृष्टी केली जात होती. ठिकठिकाणी भाविक भगवंतांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेत होेते. शंखेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिर, सिडको, पार्श्वनाथ जैन मंदिर, जोहरीवाडा, विमलनाथ जैन मंदिर, जाधवमंडी येथील भगवंतांचे रथ, तर राजाबाजार जैन मंदिर, सराफा व हडको येथील जैन मंदिर व सैतवाल जैन मंदिरांतील पालखी शोभायात्रेत सहभागी झाली होती.


स्वच्छतेचा आदर्श
वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने शोभायात्रेत स्वच्छतेसाठी दोन वाहने लावण्यात आली होती. जागोजागी स्टॉलमधून शीतपेय व खाद्यपदार्थ मिळत होते. त्याचे पॅकिंग उचलण्यात येत होते. शोभायात्रा पुढे गेली की, अवघ्या पाच मिनिटांत पाठीमागील रस्ता स्वच्छ केला जात होता.

क्षणचित्रे
१) बँड पथकाने वाजविलेल्या धार्मिक, देशभक्तीपर गीतावर तरुणाई थिरकत होती.
२) सकल जैन समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या रंगातील नेहरूशर्ट, पायजामा घातल्याने सप्तरंगी वातावरण निर्माण झाले होते.
३) महिलांनी कल्पकतेने सजविलेल्या छत्र्यांद्वारे सामाजिक, धार्मिक संदेश दिला.
४) शोभायात्रेत युवक-युवती, महिलांची संख्या वाखाणण्याजोगी ठरली.
५) सकल जैन बांधवांसोबत अन्य समाजातील नागरिकांनी सहभागी होऊन शोभायात्रेचा आनंद द्विगुणित केला.
६) हजारो समाजबांधवांनी भक्ती व शिस्तीचे दर्शन घडविले.
७) लहान मुलांनीही देखाव्यात सहभागी होऊन आपले योगदान दिले.
८) महिलांनीही धार्मिक गीते गाऊन वातावरण मंगलमय केले होेते.

Web Title: 'Zoe and Zine Do' messages from the showbiz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.