प्राणिसंग्रहालयाचे तिकीट ५ पट महागले
By Admin | Published: February 18, 2016 11:54 PM2016-02-18T23:54:51+5:302016-02-19T00:02:05+5:30
औरंगाबाद : उत्पन्नवाढीसाठी महानगरपालिकेने गुरुवारी सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात जबर वाढ केली. प्रशासनाने मांडलेला दरवाढीचा ठराव स्थायी समितीने किंचित बदलांसह मंजूर केला.
औरंगाबाद : उत्पन्नवाढीसाठी महानगरपालिकेने गुरुवारी सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात जबर वाढ केली. प्रशासनाने मांडलेला दरवाढीचा ठराव स्थायी समितीने किंचित बदलांसह मंजूर केला. त्यानुसार उद्यानाच्या तिकिटात दुप्पट आणि प्राणिसंग्रहालयाच्या दरात तब्बल पाचपट वाढ करण्यात आली आहे. आता मोठ्यांसाठी उद्यानाचे तिकीट दहा रुपयांवरून वीस रुपये आणि प्राणिसंग्रहालयाचे तिकीट १० रुपयांवरून थेट पन्नास रुपये करण्यात आले आहे.
मनपा प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यात उद्यानाचे तिकीट प्रौढांसाठी दहावरून तीस रुपये आणि लहान मुलांकरिता पाचवरून १५ रुपये करण्याची शिफारस केली होती. त्याप्रमाणे प्राणिसंग्रहालयाचे तिकीटही प्रौढांकरिता दहावरून शंभर रुपये आणि लहान मुलांसाठी पाचवरून ५० रुपये करण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. त्याला स्थायी समितीच्या बहुसंख्य सदस्यांनी सुरुवातीला आक्षेप घेतला. प्रशासनाने सुचविलेली दरवाढ खूपच जास्त असल्याचा आक्षेप एमआयएमचे नगरसेवक विकास एडके, अब्दुल नाईकवाडी, समिना शेख, शिवसेनेचे गजानन मनगटे, मकरंद कुलकर्णी, शहर विकास आघाडीचे गजानन बारवाल, भाजपचे नितीन चित्ते यांनी घेतला.
यानंतर सभापती दिलीप थोरात यांनी दरवाढीच्या आवश्यकतेविषयी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. नाईकवाडे आणि आयुक्त म्हणून सभागृहात उपस्थित असलेले अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्याकडे विचारणा केली. त्यावर प्राणिसंग्रहालयाचे अद्ययावतीकरण करणे गरजेचे असून त्यासाठी सुमारे ३० कोटी रुपये खर्च येणार आहे. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता मनपाला हा खर्च करणे शक्य नाही. म्हणून उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या तिकीट दरात वाढ करणे आवश्यक आहे, असा खुलासा रमेश पवार आणि नाईकवाडे यांनी केला. त्यावर सखोल चर्चा झाल्यावर सदस्यांनीही दरवाढीस संमती दिली. मात्र, प्रशासनाने सुचविलेली दरवाढ अवास्तव असल्याचे मतही मांडले. उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात गरिबांना येणे परवडेल अशीच दरवाढ असावी, अशी विनंती या सदस्यांनी सभापतींकडे केली. त्यानंतर सभापती थोरात यांनी सदस्यांच्या संमतीने उद्यानाच्या तिकीट दरात दुपटीने, तर प्राणिसंग्रहालयाच्या तिकीट दरात दहापटींऐवजी पाचपट वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला.