झेडपीच्या विद्यार्थिनींची ‘रॉकेट’ भरारी; तिघींनी बनवलेल्या सॅटेलाइटचे चेन्नईतून प्रक्षेपण
By विजय सरवदे | Published: March 4, 2023 06:56 PM2023-03-04T18:56:10+5:302023-03-04T18:57:06+5:30
छत्रपती संभाजीनगर येथील मनपा, जि.प. शाळेतील तिघी जणींने तयार केला उपग्रह
छत्रपती संभाजीनगर : महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांमधील तीन विद्यार्थिनींनी तयार केलेले १५० पिको सॅटेलाइट रॉकेट चेन्नई येथील पट्टीपुलमम येथून यशस्वीपणे अवकाशात सोडण्यात आले. अशोकनगर महापालिका शाळेची विद्यार्थिनी समीक्षा विठ्ठल गायकवाड, जिल्हा परिषद आसेगाव येथील कल्याणी जेठे व लासूर येथील प्रांजल साबळे अशी नावे भावी वैज्ञानिकांची आहेत. या तिघींनी तयार केलेले हे उपग्रह वातावरणातील तापमान, दाब, ऑक्सिजनचा सहभाग, कार्बनडाय ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साईड व अन्न वायूंची स्थिती दर्शवते. या रॉकेटमध्ये हायब्रीड इंधन वापरण्यात आले आहे. तसेच या रॉकेटचे सुटे भाग पुन्हा वापरले जातात.
भारतातील पहिल्या हायब्रीड रॉकेट लॉन्च प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हे प्रशिक्षण आसेगाव येथे अमेरिकन इंडिया फाउंडेशनतर्फे १९ फेब्रुवारीला घेण्यात आले होते. यामधून मनपाच्या अशोकनगर शाळेची विद्यार्थिनी समीक्षा विठ्ठल गायकवाड, जिल्हा परिषद आसेगाव येथील कल्याणी जेठे व लासूरमधील प्रांजल साबळे यांची चेन्नई येथील प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. राकेट लॉन्चिंगप्रसंगी अमेरिकन इंडिया फाउंडेशनचे सतीश काटकर, मनपाच्या शिक्षक मधुश्री देवकाते, जि.प. शिक्षिका शीतल तुपे या सहायक प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन इंडिया फाउंडेशन प्रायव्हेट लिमिटेड, मार्टिन ग्रुप फाउंडेशन आणि एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्यावतीने केले गेले होते. सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या शाळांमधील अडीच हजार विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात राज्यपाल व तामिळनाडूचे लेफ्टनंट गव्हर्नर प्रमुख पाहुणे होते. डॉक्टर अब्दुल कलाम यांचे भाचे संस्थेचे सहसंस्थापक एम.जे. शेख सलीम, मार्टिन ग्रुपचे संस्थापक लिमा रोज, स्पेस झोन इंडिया प्रा.लि.चे. डॉ. आनंद मेघालिंम उपस्थित होते.