ZP शिक्षक बुलेटवर पोहचला जगातील सर्वात उंच रस्त्यावर; २३ दिवसांत ६ हजार किमी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 08:11 PM2023-06-29T20:11:10+5:302023-06-29T20:27:34+5:30

लडाखमधील जगातील सर्वाधिक उंचीच्या रस्त्यावर एकट्याने केला धाडसी बुलेट प्रवास

ZP teacher Anil Deshmukh from Paithan travels 6 thousand km on bullet; Directly reach the world's highest road Ladakh's Chisumle-Demchok | ZP शिक्षक बुलेटवर पोहचला जगातील सर्वात उंच रस्त्यावर; २३ दिवसांत ६ हजार किमी प्रवास

ZP शिक्षक बुलेटवर पोहचला जगातील सर्वात उंच रस्त्यावर; २३ दिवसांत ६ हजार किमी प्रवास

googlenewsNext

- संजय जाधव

पैठण:जगातील सर्वांधिक उंचीच्या लेह लडाखला गवसनी घालणारा साहसी सोलो बुलेट प्रवास पैठण येथील जिल्हा परिषद शिक्षक अनिल देशमुख यांनी नुकताच  पूर्ण केला आहे. खडतर अडचणी व जीवघेण्या आव्हानावर मात करीत एकट्याने  बुलेट मोटारसायकलवर त्यांनी २३ मे ते १४ जून या २३ दिवसात ६४३२ किलोमीटरचा केलेला धाडसी प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे. 

बर्फवृष्टी, विरळ ऑक्सिजन, सतत बदलणारे हवामान, निर्जन रस्ते, अतिविरळ लोकवस्ती, लडाखच्या दूरक्षेत्रातील प्रतिकूल पर्यावरण, पाण्याचे बदलते वेगवान प्रवाह, वेगवान वारे, बर्फाळ रस्ते, वाळवंट, नद्यातील रस्ते, मोजकेच पेट्रोल पंप आदी अनेक आव्हानांचा सामना करीत, वयाच्या ५२ व्या वर्षी देशमुख यांनी सोलो बुलेट राईड पूर्ण केली.    

शाळेत परमवीरचक्र विजेत्यांची जयंती साजरी करताना सियाचिन-लडाख मधील प्रतिकूल वातावरणाची  माहिती बरकाईने वाचनात आली. ही सगळी भूमी जवळून अनुभवन्याची प्रेरणा मनात निर्माण झाली, संकल्प का कोई विकल्प नहीं होता, या उक्तीप्रमाणे अमंलात आणला. सोलो राइडचा  निर्णय घेतला, पण त्यामुळे स्वतःसोबत राहण्याची व स्वतःशी  मैत्री करण्याची  संधी मिळाली.  भारत भूमीच्या वरच्या भागात पैठणपासून ३००० किमी दूर असताना एकटे एकदाही वाटले नाही, लोकांचे झालेले सहकार्य, मदत शब्दात व्यक्त करता येणार नाही, असे देशमुख यांनी सांगितले. 

समुद्रसपाटीवरील उंचीपासून एकोणावीस हजार फुटापर्यंतची उंची या राईडमध्ये  गाठली गेली. या प्रवासात त्यांनी मध्यप्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश,जम्मू-काश्मीर ही सात राज्य,चंदीगड, लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश व दिल्ली, चंदीगड, लेह,जयपूर, श्रीनगर, जम्मू, कारगिल या सहा राजधानीच्या रस्त्याने मार्गक्रमण केले. अशा स्वरूपाचा सोलो प्रवास पूर्ण करणारे अनिल देशमुख हे औरंगाबाद जिल्हा परिषदेचे पहिलेच शिक्षक असून एकमेव पैठणकर नागरिक आहेत.

अनेक खडतर अनुभव
लेहमध्ये पोहचलो  तेव्हा जेथे जायचे त्या भागात तीव्र बर्फवृष्टीमुळे रस्ते पूर्णतः बंद होते. अगोदरच श्रीनगर मधल्या अवकाळी पावसाने दोन दिवस अडकलो होतो, आता पुन्हा अनिश्चतता वाट्याला आली, नाइलाजाने ज्या लोमा परिसरात शेवटी प्रवास करायचा होता तिथे अगोदर जाण्याचा निर्णय घेतला. या परिसरात तुलनेत लोकवस्ती कमी, रस्ते खराब आणि उंची जास्त होती. 

रस्ता बदलाचा निर्णय अंगाशी आला
हेनले गावात होम स्टेला असताना रात्री ऑक्सिजनची कमतरता जाणवायला लागली, एएमएस झाला, पण संयमाणे, मनोबल पक्के ठेवत रात्र काढली. तेथून  प्राथमिक वैद्यकीय मदत २७५ किमी दूर होती, पण सतत पाणी पीत राहिलो आणि तब्बेत सुधारत गेली, प्रवासमार्ग बदलण्याचा निर्णय जीवावर बेतणार होता. पण सुदैवाने सर्व निभावले असा खडतर अनुभव अनील देशमुख यांनी सांगितला. लोकांच्या झालेल्या मदतीचे काही प्रसंग देखील खूप भावनिक आहेत. सियाचिन बेस कॅम्पवर एक सर्वसामान्य नागरिक टस्कुर सोनम मोटुप यांनी मदतीसाठी पैसे घेण्यास विनम्रपणे नकार देत दलाई लामा यांचा शिष्य असल्याचे सांगितल्याची आठवण देशमुख यांनी सांगितली.

प्रवासात या ठिकाणी दिली भेट 
जगातील सर्वात उंचीवरील मोटारेबल रोड उमिंगला, खरडुगला पास, जगातील सर्वात उंचीवरील सैन्यतळ सियाचिन बेस कॅम्प, पाकिस्तानच्या सीमेपलीकडील २०० मीटर अंतरावर असलेले बंकर ज्या गावातून दिसते  ते भारतीय हद्दीतील शेवटचे खेडे थांग, सत्तर टक्केचीन  व तीस टक्के भारतीय हद्दीत असलेले जगात सर्वात उंचावरचे खाऱ्या पाण्याचे सरोवर पॅंगोग लेक, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड शहर असलेल्या द्रास शहरातील कारगिल युद्धस्मारक, कारगिल युद्धक्षेत्रातील टोलोलिंग पहाड, बत्रा पॉईंट, टायगर हिल सह १९६२ चीनच्या युद्धभूमितील चुशूल परिसर, अक्सई चीन, १९४८ च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात गमावल्यानंतर जिगरीने जिंकलेले  युद्धक्षेत्र, परमवीर चक्र विजेत्या शैतानसिंग यांनी चमत्कार  घडविलेली विरभूमी तारापॉइंट, इंडो तिबेट सह चीन आणि पाकिस्तानचे  सिमाक्षेत्र, जगातील सर्वात उंचावर असलेली हेनले येथील विश्वविख्यात लाईट ऑबझरव्हेटरी, पर्यायी शिक्षणाचे केंद्र असलेले सुप्रसिद्ध सासमोल स्कुल, जगात सर्वाधिक उंचीवर असलेले मिलिटरी गुडविल स्कूल, सैन्य संग्रहालय आदी ठिकाणाला बुलेटवर प्रवासात देशमुख यांनी भेट दिली.

Web Title: ZP teacher Anil Deshmukh from Paithan travels 6 thousand km on bullet; Directly reach the world's highest road Ladakh's Chisumle-Demchok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.