झेडपीत महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे..!
By Admin | Published: March 28, 2017 12:04 AM2017-03-28T00:04:16+5:302017-03-28T00:08:13+5:30
जालना :५ एप्रिल रोजी होणाऱ्या विशेष सभेत विविध विभागांचे सभापती निवडले जाणार आहेत.
जालना : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आघाडी करुन सत्ता स्थापन केली. ५ एप्रिल रोजी होणाऱ्या विशेष सभेत विविध विभागांचे सभापती निवडले जाणार आहेत. वित्त व नियोजनसह शिक्षण हे महत्त्वाचे खाते राष्ट्रवादी काँग्रेस, तर महिला व बालकल्याण विभाग काँग्रेसकडे जाण्याचे संकेत मिळत आहेत.
जालना जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युती तुटल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. निवडणूक निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेरच्या क्षणापर्यंत भाजपाने संख्याबळ जुळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय समीकरणे जुळू शकले नाहीत. अखेर सर्वाधिक २२ जागा मिळवूनही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेनेला यश आले. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन अध्यक्ष पद पटकावले. या पदावर अनिरुद्ध खोतकर यांची तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे सतीश टोपे यांची निवड झाली. शिक्षण, आरोग्य, कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याणच्या सभापती निवडीसाठी ५ एप्रिलला होणाऱ्या विशेष सभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.