‘झेडपी’च्या माध्यमिक शाळा ‘सलाईनवर’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 12:02 AM2017-05-18T00:02:42+5:302017-05-18T00:04:37+5:30

उस्मानाबाद : लोकप्रतिनिधींसह शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्हा परिषद माध्यमिक शाळांना अखेरची घरघर लागली आहे.

ZP's secondary school 'salalin'! | ‘झेडपी’च्या माध्यमिक शाळा ‘सलाईनवर’ !

‘झेडपी’च्या माध्यमिक शाळा ‘सलाईनवर’ !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : लोकप्रतिनिधींसह शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्हा परिषद माध्यमिक शाळांना अखेरची घरघर लागली आहे. सुमारे ६० टक्के शाळांमध्ये दोनशेपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या आहे. विशेष म्हणजे, पटसंख्या वाढावी या उद्देशाने १४ शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण सुरू करण्यात आले. परंतु, सदरील मात्राही निरर्थक ठरल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. हे चित्र बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असतानाही ना लोकप्रतिनिधी, ना शिक्षण विभागाचे अधिकारी ही बाब गांभीर्याने घेत आहेत.
एकीकडे शासन जिल्हा परिषद शाळांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु, दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडून या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत ५३ माध्यमिक शाळा चालविल्या जातात. यातील बहुतांशी शाळा या तालुक्याच्या ठिकाणी आहेत. असे असतानाही विद्यार्थी संख्येची घसरण सुरूच आहे. ही घसरण थांबविण्याच्या अनुषंगाने प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळेच आज ५३ पैकी ३५ शाळा अशा आहेत, की जेथे विद्यार्थीसंख्या दोनशेपेक्षाही कमी आहे. तर उर्वरित १८ शाळांत मात्र, दोनशेवर विद्यार्थी आहेत. उपरोक्त आकडेवारी पाहता, जवळपास ६० टक्क्यांवर शाळा सलाईनवर असल्याचे समोर येते. या शाळांची अवस्था सुधारण्यासाठी फारशे प्रयत्न होत नसल्यानेच वर्षागणिक पटसंख्या घटू लागली आहे. पटसंख्येची घसरगुंडी थांबविण्यासोबतच विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने माध्यमिक शाळांतून व्यवसाय शिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. या उपक्रमांतर्गत ५३ पैकी जवळपास १४ शाळांची निवड झाली आहे. परंतु, या उपक्रमाबाबात जनजागृती करण्यात प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे व्यवसाय शिक्षण सुरू करूनही पटसंख्या अपेक्षित प्रमाणात वाढली नाही. शिक्षण विभागाचा हा सर्व गोंधळी कारभार सुरू असताना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने संबंधित अधिकाऱ्यांचेही चांगलेच फावले. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांनी तरी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य पालकांतून व्यक्त होत आहे.
पटसंख्या वाढणार कधी?
जिल्हा परिषदेकडे तज्ज्ञ शिक्षक आहेत. सर्व सोयीसुविधाही आहेत. व्यवसाय शिक्षणही सुरू करण्यात आले आहे. असे असतानाही पटसंख्या काही केल्या वाढत नाही. त्याला कारणही तसेच आहे. पटसंख्या का कमी होतेय? याचा विचार करायला कोणीही राजी नाही. कधी संबंधित शिक्षक, मुख्याध्यापकांच्या बैठकाही होत नाहीत. त्यामुळे पटसंख्या वाढणार तरी कशी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Web Title: ZP's secondary school 'salalin'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.