“लिहून घ्या, एकनाथ शिंदे कार्यकाळ पूर्ण करणारच, एकही दिवस कमी होणार नाही”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:54 PM2023-10-31T12:54:39+5:302023-10-31T12:56:46+5:30
Devendra Fadnavis: राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा भडका उडालेला असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्तीसगडमध्ये जाऊन विधानसभा निवडणूक प्रचारात सहभाग घेतला.
Devendra Fadnavis: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत शातंतेत सुरू असलेल्या आंदोलनाला जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमुळे हिंसक वळण लागले. जालना, बीड, धाराशीव, लातूर, नंदूरबार, यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाले. जाळपोळीच्या घटनांनंतर अनेक नेत्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा भडका उडालेला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसछत्तीसगड येथे प्रचारात व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत.
छत्तीसगड येथे विधानसभा निवडणुका होत आहेत. प्रचाराला वेग येत आहे. भाजपचे अनेक नेते, मंत्री छत्तीसगडमध्ये जात आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांनी छत्तीसगडमधील रायपूर शहर येथे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला, चर्चा केली. छत्तीसगड येथे मीडियाशी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे कार्यकाळ पूर्ण करणारच, एकही दिवस कमी होणार नाही
आमदार अपात्रता प्रकरण, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना छत्तीसगडमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना, ही गोष्ट मी महाराष्ट्रात जाऊनही सांगणार आहे. तुम्ही लिहून घ्या. मी जे बोलणार आहे, ते माझे विधान राष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमांमध्ये जात आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. ते त्यांच्या संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करतील. एक दिवसही कमी होणार नाही. कार्यकाळ पूर्ण करणारच, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस छत्तीसगड येथे प्रचाराला गेल्याबाबत विरोधकांकडून तीव्र टीका केली जात आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत, त्यांची घरे जाळली जात आहेत. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस दिवस तीव्र होत आहे. याकाळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे. परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या या निष्क्रिय गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.