"भाजपाला गरिबांच्या हाती सत्ता नकोय"; काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 12:33 PM2023-11-02T12:33:15+5:302023-11-02T12:36:55+5:30
राज्याच्या नक्षलग्रस्त बस्तर भागात निवडणूक रॅलीला केलं संबोधित
सुकमा (छत्तीसगड) : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मागासवर्गातील असल्याने त्यांना संसद भवनाच्या पायाभरणी समारंभासाठी बोलावले नाही तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी असल्याने उद्घाटनाला आमंत्रित करण्यात आले नव्हते. सरकारला गरिबांच्या हातात सत्ता जाऊ द्यायची नाही, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी केला आहे.
राज्याच्या नक्षलग्रस्त बस्तर भागातील सुकमा जिल्ह्यात निवडणूक रॅलीला संबोधित करताना खरगे म्हणाले की, आदिवासींचे जल, जंगल आणि जमीन यांच्या रक्षणाच्या लढ्यात काँग्रेसने नेहमीच त्यांना साथ दिली आहे. काँग्रेस पक्षाने देश स्वतंत्र केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली, असे खरगे यावेळी म्हणाले.
काँग्रेसमुळेच विकास
- देशाच्या विकासात काँग्रेसचे योगदान अधोरेखित करताना ते म्हणाले की, देश स्वतंत्र झाला तेव्हा शाळा, महाविद्यालये बांधली गेली. बँका नव्हत्या, उद्योग नव्हते. आज जे काही घडत आहे, त्यात काँग्रेसचे सर्वात मोठे योगदान आहे.
- आम्ही देशासाठी काही केले आहे म्हणून आम्ही मते मागत आहोत. या देशातील नागरिकांच्या हितासाठी आम्ही मते मागत आहोत. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस पक्षाचे लोक सुळावर चढले होते, म्हणूनच आम्ही मते मागत आहोत.