सीबीआय अन् ईडी हे भाजपचे उमेदवार, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 05:49 AM2023-11-10T05:49:42+5:302023-11-10T07:14:09+5:30

छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील बैकुंठपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना खरगे म्हणाले की, भाजपला वाटते की, केवळ त्यांनीच हिंदूंचा ठेका घेतला आहे.

CBI and ED are BJP candidates, Congress president Kharge's criticism | सीबीआय अन् ईडी हे भाजपचे उमेदवार, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका

सीबीआय अन् ईडी हे भाजपचे उमेदवार, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका

बैकुंठपूर : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार तर भाजपकडून ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स असे तिघे जण निवडणूक लढवत असल्याचा टोला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपला हाणला आहे.

छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील बैकुंठपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना खरगे म्हणाले की, भाजपला वाटते की, केवळ त्यांनीच हिंदूंचा ठेका घेतला आहे. पण, आपण हिंदू नाही का? माझे नाव मल्लिकार्जुन आहे, ज्याचा अर्थ शिव आहे. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. 
भाजपचे नेते आमच्या उमेदवारांवर आणि त्यांच्या नातेवाइकांवर ईडी आणि आयकर विभागाच्या माध्यमातून हल्ले करत आहेत. मात्र, छत्तीसगडची जनता घाबरलेली नाही. त्यांना मतदानातून जनता धडा शिकवेल, असे मल्लिकार्जून खरगे म्हणाले.

त्यांनी हिंदूंचा ठेका घेतला आहे का?
पंतप्रधान मोदी नुकतेच येथे आले होते आणि त्यांनी सांगितले की येथे सण साजरे करणे कठीण आहे. तुम्ही सांगा, येथे कोणता सण साजरा करणे कठीण आहे? लोकांना भडकविण्यासाठी ते असे बोलतात. त्यांना वाटते केवळ भाजप हिंदूंचा आहे, त्यांनी (हिंदूंचा) ठेका घेतला आहे का? आम्ही हिंदू नाही का? माझे नाव मल्लिकार्जुन आहे. मल्लिकार्जुन हे शिवाचे नाव आहे. लोकांना हे सांगत राहिला तर देशात द्वेषाचे वातावरण निर्माण होईल. हा द्वेष संपवण्यासाठी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली होती, असे खरगे म्हणाले.

Web Title: CBI and ED are BJP candidates, Congress president Kharge's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.