आणखी एक प्रताप! महाभागांनी धरणातील लाखो लीटर पाणी वाया घालवले; कारण ऐकून संताप येईल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 02:11 PM2023-05-31T14:11:18+5:302023-05-31T14:11:40+5:30
बादलखोल वन्यजीव अभयारण्य, जो जशपूरचा भाग आहे, जिथे हत्ती मोठ्या संख्येने फिरत असल्याच्या बातम्या येतात
रायपूर - कांकेर जिल्ह्यात अधिकाऱ्याने लाखो लीटर पाणी वाया घालवण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात धरणातील पाणी विनाकारण उपसा केल्याची घटना घडली आहे. वन्यजीव ज्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात तिथे काही महाभागांनी ताजे मासे पकडण्याच्या हेतूने लाखो लीटर पाणी वाया घालवले.
वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने जशपूर जिल्ह्यातील बगिचा विकास गटातील बादलखोल वन रिझर्व्हमध्ये गायलुंगा गावाजवळ लाखो लीटर पाण्यासाठी स्टॉप डॅम बांधण्यात आला होता, मात्र उपद्रवी लोकांनी गेट उघडून लाखो लिटर पाणी बर्बाद केले. या धरणात सुमारे ६ फुटांपर्यंत पाणी असून धरणातून पाणी ओसंडून वाहत होते. धरणात ३०० मीटर लांबीपर्यंत पाणी होते. या अभयारण्यात असणाऱ्या वन्य प्राण्यांबरोबरच आजूबाजूच्या गावातील गुरेही उन्हाळ्यात येथे पाणी पिण्यासाठी येत असत, मात्र आता धरणातून सर्व पाणी वाहून गेले आहे, त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावांमध्ये शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पाण्याच्या शोधात हत्ती गावात घुसण्याची भीती
बादलखोल वन्यजीव अभयारण्य, जो जशपूरचा भाग आहे, जिथे हत्ती मोठ्या संख्येने फिरत असल्याच्या बातम्या येतात. हत्तींचा कळप येथे नेहमीच ये-जा करत असतो. अशा स्थितीत स्टॉप डॅममधून पाणी वाया गेल्याने आता त्या भागात पाणी पिण्यासाठी येणारे वन्यप्राणी आता गावाकडे येऊ शकतात. बादलखोलच्या या जंगलात अनेक प्रकारचे वन्यजीव आहेत, ज्यामध्ये हरीण, हिरणे, अस्वल, नीलगाय, वाघ अशा प्रजाती मोठ्या प्रमाणात आहेत.
मासेमारीसाठी पाणी घालवले वाया
परिसरात राहणारे आदिवासी कधीच अशी कृत्ये करत नाहीत असे जाणकारांचे मत आहे. निश्चितच काही टवाळखोरांनी केलेले हे कृत्य आहे. कारण जंगलात राहणारा एक मोठा आदिवासी समूह उन्हाळ्यात पाण्यावर अवलंबून असतो आणि त्यांची मासेमारीची परंपरा म्हणजे बनशी खेळणे, जाळे टाकणे अशी आहे. पाणी वाया घालवणे, वाहत्या पाण्यातून मासेमारी न करणे हे ते करणार नाहीत असं स्थानिकांनी सांगितले.