संतापजनक! अधिकाऱ्याचा iPhone धरणात पडला; ३ दिवस पंपाने लाखो लीटर पाणी उपसले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 12:09 PM2023-05-26T12:09:25+5:302023-05-26T12:10:08+5:30
कोयलीबेडा ब्लॉकचे फूड विभागाचे अधिकारी रविवारी सुट्टीसाठी खेरकट्टा परळकोट जलाशयावर पोहोचले होते.
कांकेर - छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात अजब प्रकार पाहायला मिळाला आहे जो ऐकून तुम्हालाही संताप येईल. पंखजूरमध्ये एका अन्न निरीक्षकाचा पाण्यात पडलेला महागडा मोबाईल परत मिळवण्यासाठी लाखो लिटर धरणातील पाणी वाया घालवले आहे. एका फोनसाठी दीड हजार एकर शेतजमीन जी सिंचनाखाली आली असती तितके पाणी काढण्यात आले. इतके करूनही अधिकाऱ्याचा मौल्यवान मोबाईल सापडला मात्र आता तो खराब झाला आहे.
कोयलीबेडा ब्लॉकचे फूड विभागाचे अधिकारी रविवारी सुट्टीसाठी खेरकट्टा परळकोट जलाशयावर पोहोचले होते. खेरकट्टा पर्लकोट जलाशयाच्या ओव्हर ब्रिजवर १५ फुटांपर्यंत भरलेल्या पाण्यात अधिकाऱ्याचा महागडा मोबाईल पडला. अधिकाऱ्याने आधी जवळच्या गावकऱ्यांना मोबाईल शोधण्यात गुंतवले. चांगले पोहणारे उतरले. मात्र त्यात केवळ अपयशच आले, त्यानंतर फोन काढण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर ३० एचपी क्षमतेचा पंप बसवून जलाशयातील पाणी बाहेर काढण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून पाणी काढण्यासाठी पंप सुरू होता.
मात्र, जलाशयातून सातत्याने पाणी उपसा होत असल्याची बाब वरपर्यंत पोहोचल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने पंप बंद करण्यात आला. त्यानंतर पुन्हा शोध घेतला असता मोबाईल सापडला, मात्र तो खराब झाला होता. अंदाजानुसार, गेल्या सोमवार ते गुरुवारपर्यंत सलग २४ तास ३० हॉर्स पॉवर मशीनच्या दोन डिझेल पंपांमुळे सुमारे २१ लाख लिटर पाणी वाया गेले. हे पाणी दीड हजार एकर जमीन सिंचनासाठी पुरेसे होते. त्या अधिकाऱ्याच्या मोबाईलमध्ये काय होते? ज्यासाठी सिंचनासाठी वापरणारे पाणी एवढ्या प्रमाणात वाया घालवले असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.
पाच फुटांपर्यंत पाणी उपसण्याची परवानगी दिली : एसडीओ
दुसरीकडे या प्रकरणी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी राम लाल धिनवार यांचे म्हणणे आहे की, ५ फुटांपर्यंत पाणी उपसण्याची परवानगी तोंडी देण्यात आली होती. मात्र आतापर्यंत १० फुटांपेक्षा जास्त पाणी काढण्यात आले आहे. मात्र, एवढ्या कडक उन्हाळ्यातही सिंचनाच्या पाण्याची नासाडी झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.