मुंबईची क्रेन, ६,००० लीटर दूध अन् बम भोलेचा निनाद! १६० फूट उंच शिवलिंगावर महाभिषेक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 06:59 PM2023-08-18T18:59:37+5:302023-08-18T18:59:51+5:30
२० फूट उंच आणि ४५ फूट अरुंद कलशाच्या सहाय्याने शिवलिंगाचा भव्यदिव्य अभिषेक घालण्यात आला
राजनांदगाव – छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील माँ पाताळ भैरवी मंदिरात असलेल्या १६० फूट उंच शिवलिंगाचा गुरुवारी महाभिषेक करण्यात आला. त्यासाठी मुंबईहून मागवण्यात आलेल्या क्रेनच्या साहाय्याने महाभिषेक करण्यात आला. ज्यामध्ये १.२५ लाख लिटर पाणी आणि ६ हजार लिटर दुधाशिवाय हळद, चंदन आणि गुलाबजलही वापरण्यात आले. महाभिषेकावेळी मुसळधार पावसातही भाविकांचा उत्साह कमी झाला नाही.
२० फूट उंच आणि ४५ फूट अरुंद कलशाच्या सहाय्याने शिवलिंगाचा भव्यदिव्य अभिषेक घालण्यात आला. बर्फानी आश्रमातील ११ पंडितांनी अभिषेक प्रसंगी नामजप केला. पावसामुळे कार्यक्रमाला उशीर झाला तरीही भाविकांचा उत्साह कायम राहिला. क्रेनमधून पाणी आणि दूध अर्पण करताच भाविकांनी पावसातच बम बम बोलेच्या घोषणा दिल्या. सर्वात आधी माँ पाताळ भैरवी मंदिरात दुपारी ३ वाजता पूजा करण्यात आली, त्यानंतर भगवान भोलेनाथाच्या सर्वात मोठ्या शिवलिंगावर ५० फूट कलशाच्या माध्यमातून दूध आणि पाण्याने अभिषेक करण्यात आला. काँग्रेस नेते तथागत पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
मुंबईहून आली क्रेन,भव्य कलशही बनवले
महादेवाच्या अभिषेकासाठी २० फूट उंच आणि ४५ फूट रुंद असा कलशही बनवण्यात आला होता. हा वजनदार कलश उचलण्यासाठी मुंबईहून क्रेनही मागवण्यात आली. बर्फानी सेवाश्रम समितीच्या भव्य माँ पाताळ भैरवी मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्तीसगडमधील सांस्कृतिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजनांदगाव येथे माँ पाताळ भैरवीचे मंदिर आहे.
या मंदिरावर लोकांची खूप श्रद्धा आहे. मंदिराचे प्रांगण शिवलिंगाच्या आकारात बनवण्यात आले आहे. यात ३ मजले आहेत. सर्वात वरच्या मजल्यात भगवान शिवाची १२ ज्योतिर्लिंगे आहेत. मधल्या मजल्यावर आई राजराजेश्वरी नऊ भव्य रूपात विराजमान आहे. शेवटच्या मजल्यात पाताल भैरवी मां काली दिसते. माँ पाताल भैरवी मंदिर जमिनीपासून १५ फूट खाली बांधले आहे. मातेच्या मूर्तीची उंची १३ फूट आहे. मंदिराच्या छतावर एक मोठे शिवलिंग दिसते, ज्याच्या समोर नंदीची मूर्ती आहे. मंदिरात स्फटिक शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. मंदिरात शिवाची १४ फूट उंचीची मूर्तीही बसवण्यात आली आहे. नवरात्रीच्या काळात छत्तीसगडच नव्हे तर इतर राज्यातूनही भाविक येथे दर्शनासाठी येतात.