iPhone साठी धरणातील लाखो लीटर पाणी वाया घालवणाऱ्या अधिकाऱ्याला जन्माची अद्दल घडली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 08:44 AM2023-05-27T08:44:06+5:302023-05-27T08:44:31+5:30
अहवालानुसार, राजेश विश्वास यांनी परवानगीशिवाय जलाशयातील ४११०४ घनमीटर पाणी उपसा केले.
कांकेर - छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील पंखाजूरमध्ये धरणातील पाण्यात फूड अधिकारी राजेश विश्वास यांचा मोबाईल पडला. त्यानंतर मोबाईलचा शोध घेण्यासाठी सलग ४ दिवस धरणातून पाण्याचा उपसा करण्यात आला. या मोबाईलची किंमत ९६ हजार रुपये होती, ज्याला मिळवण्यासाठी अधिकाऱ्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी केली.
हे प्रकरण चर्चेत येताच शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळाला. आता याची गंभीर दखल घेत फूड अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याचसोबत भरपाई म्हणून अधीक्षक अभियंता कार्यालयाने पाणी उपसण्याची तोंडी परवानगी देणाऱ्या एसडीओ आर के धीवर यांच्या पगारातून रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. इंद्रावती प्रकल्प विभाग, जगदलपूरच्या वरिष्ठ अभियंत्याने यासंदर्भात एक पत्र जारी केले आहे. २१ मे रोजी राजेश विश्वास मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी परळकोटला गेला होता. यादरम्यान त्यांचा मोबाईल धरणाच्या वेस्ट वेअरच्या स्टॅलिन पात्रात पडला होता.
'तसे न केल्यास कारवाई केली जाईल'
अधिकाऱ्यांना न सांगता प्रत्येकी ३० एचपीचे दोन मोठे पंप बसवून ४ दिवसांत २१ लाख लिटर पाणी वाया गेले. हा दंडनीय गुन्हा आहे. यासंदर्भात तीन दिवसांत उत्तर द्या. तसे न केल्यास कारवाई केली जाईल. याप्रकरणी जलसंपदा विभागाचे एसडीओ आर के धीवार सांगतात की, ५ फुटांपर्यंत पाणी रिकामे करण्याची परवानगी तोंडी देण्यात आली होती. मात्र, यापेक्षा जास्त पाणी काढण्यात आले.
त्याचवेळी, राजेश विश्वास याला निलंबित करण्याचे आदेश जारी करताना, जिल्हा उत्तर बस्तर कांकेरच्या जिल्हाधिकारी प्रियंका शुक्ला यांनी म्हटलं की, पखंजूर अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांनी परळकोट जलाशयाच्या वेस्ट वेअर पात्रातून सलग ४ दिवस पाणी उपसा करून त्यांच्या मोबाईलचा शोध घेतला. त्यात लाखो लीटर पाणी वाया गेले. याबाबत एसडीएम पखंजूर यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याच्या अहवालानुसार, राजेश विश्वास यांनी परवानगीशिवाय जलाशयातील ४११०४ घनमीटर पाणी उपसा केले. पाणी काढण्यासाठी अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांनी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता आपल्या पदाचा गैरवापर करून लाखो लिटर पाण्याची कडक उन्हात नासाडी केली. हे त्याचे असभ्य वर्तन आहे जे स्वीकारले जाऊ शकत नाही.