विष्णुदेव साय यांचा शपथविधी 13 डिसेंबरला होणार, DCM सह मंत्री शपथ घेणार; दिसेल युपी स्टाईल!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 10:02 PM2023-12-10T22:02:34+5:302023-12-10T22:04:09+5:30
हा शपथविधी सोहळा पोलीस परेड ग्राऊंडवर पार पडेल...
छत्तीसगडमधील भाजपच्या दणदणीत विजयानंतर, मुख्यमंत्र्यांच्या नावावरून निर्माण झालेला सस्पेन्स आज अर्थात रविवारी संपुष्टात आला. आदिवासी समाजातून येणारे विष्णुदेव साय हे छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. दरम्यान, 13 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याचेही निश्चित झाले आहे. या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री शपथ घेतील. हा शपथविधी सोहळा पोलीस परेड ग्राऊंडवर पार पडेल. मात्र, नेमके किती मंत्री शपथ घेणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, राज्यात युपी स्टाइलमध्ये 2 उपमुख्यमंत्री असणार हे निश्चित झाले आहे.
दोन उपमुख्यमंत्री आणि रमन सिंह विधानसभा अध्यक्ष -
विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर, अरुण साओ आणि विजय शर्मा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. तर माजी मुख्यमंत्री रमण सिंह हे विधानसभा अध्यक्ष पदाची धुरा सांभाळतील. तर दुसरीकडे, नवे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी राज्यपाल विश्वभूषण हरिश्चंद्र यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. लवकरच शपथविधी सोहळा आणि मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांची नावेही निश्चित केली जातील, असे सांगितले जात आहे.
आपल्या पहिल्याच प्रतिक्रियेत काय म्हणाले विष्णुदेव साय? -
मुख्यमंत्री पदासाठी आपल्या नावाची घोषणा झाल्यानंतर, विष्णुदेव साय माध्यमांसोबत बोलताना म्हणाले, "मुख्यमंत्री या नात्याने माझ्या सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी दिलेली हमी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 18 लाख घरे मंजूर करणे हे नवीन छत्तीसगड सरकारचे पहिले काम असेल."
कोण आहेत विष्णुदेव राय -
विष्णुदेव राय हे छत्तीसगडमधील कुनकुरी विधानसभा मतदार संघातील आहेत. राज्यात आदिवासी समुदायाची संख्या सर्वाधिक आहे आणि विष्णुदेव राय याच समुदायातून येतात. राय 2020 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. याशिवाय ते खासदार आणि केंद्रीय मंत्रीही होते. महत्वाचे म्हणजे, राय यांची गणना संघाच्या काही जवळच्या नेत्यांमध्ये होते. ते रमन सिंह यांच्याही जवळचे आहेत. ते 1999 ते 2014 पर्यंत रायगडमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात साय यांना केंद्रात मंत्रीपदही मिळाले होते.
असे आहे छत्तीसगडचे बलाबल -
छत्तीसगडमधील जनतेने यावेळी काँग्रेसला नाकारत भाजपला सिंहासनावर बसवले आहे. येथील 90 जागांपैकी भाजपला 54 तर काँग्रेसला 35 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय गोंडवाना गणतंत्र पक्षाला (जीजीपी) एक जागा मिळाली आहे.