नियमानुसारच मेश्राम यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी
By Admin | Published: September 3, 2015 11:05 PM2015-09-03T23:05:36+5:302015-09-03T23:05:36+5:30
नागपूर विद्यापीठ : वित्त व लेखा अधिकाराच्या मुद्यावर प्रशासनाची स्पष्टोक्ती
न गपूर विद्यापीठ : वित्त व लेखा अधिकाराच्या मुद्यावर प्रशासनाची स्पष्टोक्तीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम यांच्याकडे विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी ही नियमानुसारच देण्यात आली असल्याची स्पष्टोक्ती प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. मेश्राम यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी कशी देण्यात आली, असे प्रश्न विचारण्यात येत होते.महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमातील तरतुदीनुसार कुलसचिव, परीक्षा नियंत्रक आणि वित्त व लेखा अधिकारी ही पदे प्रशासकीय स्वरूपाची संवैधानिक पदे आहेत. ही पदे रिक्त असताना याचा अतिरिक्त कार्यभार अनेकदा विद्यापीठ किंवा संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांकडे देण्यात येतो. प्रशासकीय अनुभव नसल्यामुळे यामुळे प्रशासकीय कामकाजात अनेक अडचणी निर्माण होतात, असे शासनाला आढळून आले होते. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफिसर्स फोरमतर्फे १८ डिसेंबर २०१२ रोजी नागपूर अधिवेशनात तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत बैठक झाली होती. संबंधित पदे रिक्त असल्यास त्याचा अतिरिक्त कार्यभार विद्यापीठात कार्यरत असलेल्या संवैधानिक पदावरील अधिकारी किंवा अनुभवी कुलसचिवांना देण्याची विनंती यावेळी करण्यात आली होती. यावर शासनाने १५ मार्च २०१३ रोजी काढलेल्या निर्णयानुसार वरील पदे रिक्त असतील तर कुलसचिव, परीक्षा नियंत्रक किंवा वित्त व लेखा अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याकडे हा कार्यभार सोपविण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले होते. पूरण मेश्राम कुलसचिव म्हणून रुजू झाल्यामुळे वित्त व लेखा अधिकारी हे पद रिक्त झाले. शिवाय त्यावेळी विद्यापीठात पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक नव्हते. त्यामुळे नियमानुसार वित्त व लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार पूरण मेश्राम यांच्याकडेच देण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.