समाजकार्य करताना पदाची आशा करू नये...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 02:40 AM2018-05-15T02:40:08+5:302018-05-15T02:40:08+5:30
गोरेगाव येथील नागरी निवारा परिषदमध्ये राहणारा अभिषेक घोगरे याची युवा समाजकार्यकर्ता म्हणून ओळख आहे. सध्या तो साठ्ये महाविद्यालय, युवासेना युनिटचा उपाध्यक्ष आहे.
गोरेगाव येथील नागरी निवारा परिषदमध्ये राहणारा अभिषेक घोगरे याची युवा समाजकार्यकर्ता म्हणून ओळख आहे. सध्या तो साठ्ये महाविद्यालय, युवासेना युनिटचा उपाध्यक्ष आहे. त्याने साठ्ये महाविद्यालयात बीएमएमचे शिक्षण घेतले असून, यंदा त्याने टीवायची परीक्षा दिली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता जोतिषशास्त्राचा अभ्यासही तो करतो. शाळेत असल्यापासून त्याला समाजकार्यांची आवड.
महाविद्यालयीन शिक्षण सुरु झाल्यावर गोरेगाव ते विलेपार्ले असा वर्षांचा प्रवास सुरु झाला. प्रवासात त्याला अनेक समस्या दिसू लागल्या. त्यातून समाजकार्य करण्याची इच्छा जागृत झाली. महाविद्यालयीन प्रश्न सोडवण्यापासून झाली. तसेच शेजारी राहणाऱ्यांना आरोग्यविषयी अडचणी असल्यास वैद्यकीय मदत करणे, शासकीय रुग्णालयात उपचार उपलब्ध करुन देणे, मैदानी खेळाचे आयोजन करुन तरुण प्रोत्साहन देणे, अशी कामे तो करतो. त्याला समाजकार्यांबरोबर चांगल्या ठिकाणी फिरायला आवडते. तसेच त्याला कबड्डीचीही आवड आहे.
अभिषेक सांगतो, कॉलेजमध्ये थोडा फेमस झाल्यावर चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आले. आपण काय बोलावे? काय बोलू नये? याचा विचार करून जबाबदारीने कसे वागावे हे शिकलो. काही चुकीचे घडल्यास त्यावर प्रतिक्रिया दिल्यास मित्रांमध्ये गैरसमज व्हायचा. समाजकार्यामुळे मला नेते, साहेब या नावाने कॉलेजमधील मित्र-मैत्रिणी बोलू लागली; परंतु समाजकार्य करताना अनेक वाईट अनुभव आले. मात्र, यातून खचून न जाता आयुष्यभर समाजकार्य करण्याची जिद्द अंगी निर्माण झाली आहे.
आजच्या तरुणपिढीला अभिषेक सांगतो की, शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षण असेल तर समाजकार्याचे महत्त्व समजते. समाजात काही चुकीचे होत असेल किंवा घडत असेल, तर त्याला वाचा फोडणे गरजेचे आहे. समाजकार्य करताना पदाची आशा करू नये. समाजाच्या हितासाठी सदैव काम करावे आणि करत राहावे.
शब्दांकन - सागर नेवरेकर