शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.शिंदे
By Admin | Published: June 17, 2015 01:33 AM2015-06-17T01:33:08+5:302015-06-17T01:33:08+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या
श वाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.शिंदेमुंबई - कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.देवानंद बाबूराव शिंदे यांची आज राज्यपाल तथा कुलपती सी.विद्यासागर राव यांनी नियुक्ती केली. डॉ.शिंदे हे सध्या औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्र विभागाचे प्राध्यापक तसेच प्रगत संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक आहेत. ६ फेब्रुवारी १९६३ रोजी जन्मलेले डॉ.शिंदे यांना शिक्षण, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रात एमएस्सी, पीएचडी प्राप्त केली आहे. डॉ.शिंदे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे रिसर्च फेलो होते. डिसेंबर २००५ पासून ते औरंगाबादला विद्यापीठाच्या रसायनशास्र विभागात प्राध्यापक आहेत. औषधीय रसायनशास्र, ड्रग डिझाईन व औषधीशास्र विश्लेषण या विषयांत त्यांना विशेष रुची आहे. डॉ.एन.जे.पवार यांचा शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यकाळ २६ फेब्रुवारी २०१५ रोजी संपल्यानंतर डॉ.अशोक भोईटे हे प्रभारी कुलगुरु म्हणून काम पाहत होते. नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के.एस.राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक शोध समिती नेमली होती. समितीने शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती राज्यपालांनी घेतल्या होत्या. त्यानंतर डॉ.शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)