नरभक्षक वाघाची वनविभागाला हुलकावणी
By Admin | Published: January 31, 2017 01:51 AM2017-01-31T01:51:24+5:302017-01-31T01:51:24+5:30
अगदी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील
वनविभागाची झोप उडाली : अनेक उपाययोजना करुनही वाघ सापडेना
मोहाळी (नलेश्वर) : अगदी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील अनेक गावात व शेतशिवारात नरभक्षक वाघाने महिन्याभरापासून धुमाकूळ घालून तीन महिलांना ठार तर दोन महिलांना जखमी केले आहे. त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील अनेक गावखेड्यात दहशत निर्माण झालेली असून त्या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वनविभाग विविध उपाय व योजना तयार करून त्याला कैद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र तो नरभक्षक वाघ वनविभागाला पाच दिवसांपासून सातत्याने हुुलकावणी देत असल्याने वनविभागाची झोप उडालेली आहे.
अगदी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्र आहे. या वनपरिक्षेत्रातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी नेहमीच वाघाच्या हल्ल्यात ठार होत असतात. मात्र अलिकडे एका नरभक्षक वाघाने सातत्याने महिन्याभरापासून गावात व शेतशिवारात धुमाकूळ घालून तीन महिलांना ठार तर दोन महिलांना गंभीररित्या जखमी केले. या घटनेने संपूर्ण सिंदेवाही तालुका दहशतीच्या सावटात आहे. आजही तो नरभक्षक वाघ गाव शेजारी व गावात येत असल्याने गाव खेड्यातील गावकरी रात्रीच्या सुमारास घराच्या बाहेर पडत नसल्याचे दिसून येते. तर या परिसरातील संपूर्ण रस्ते सायंकाळी ५ वाजतानंतर ओस पडू लागल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचेही शेतीचे कामे त्या नरभक्षक वाघाच्या दहशतीमुळे ठप्प पडलेले आहे.
नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने विविध उपाय व योजना केल्यात. त्यात जवळपास १५० वन कर्मचारी व अधिकारी, वाघ जेरबंद करणारे तज्ज्ञ, ताडोबा प्रकल्पाचे वैद्यकीय अधिकारी व त्याची चमू, तसेच वाघाला शुटरने गुंगीचे औषध देऊन त्याला बेशुद्ध करण्यासाठी ट्रंक्युलायझिंग शॉप शुटर हे वाघ पकडण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. परिसरात गस्त घालण्यासाठी जवळपास २० गाड्याचा ताफा, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गावात चार पिंजरे आणि त्यात एका पिंजऱ्यात बकरी, एका पिंजऱ्यात रेडा व दोन पिंजऱ्यात दोन कुत्रे ठेवण्यात आले आहेत तर दोन ठिकाणी मोकळ्या जागेत बकऱ्या बांधून ठेवल्याची माहिती सिंदेवाही वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी वसंत कामडी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
शिवणी वनपरिक्षेत्रात तीन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असून एका पिंजऱ्यात रेडा तर दोन पिंजऱ्यात बकऱ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. तीन ठिकाणी पिंजऱ्याविनाच बकऱ्या बांधून ठेवल्याची माहिती एस.आर. लागडे यांनी दिली. तसेच गावातील वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्त्वाखाली दहा युवकांची ३०० रुपये या प्रमाणे मजुरी देऊन गस्त घालण्यात येत आहे. तर दोन ठिकाणी मचानी उभारुन त्याद्वारे पाळत ठेऊन ट्रॅक्युलायझर शॉप शुटर तैनात ठेवले आहेत.
असे अनेक उपाय व योजना करुनदेखील आज पाच दिवसांपासून त्या नरभक्षक वाघाने वनविभागाला हुलकावणी देत जवळपास दीडशे वनकर्मचारी व अधिकाऱ्यांची झोप उडवलेली आहे. वनविभागही रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करुन त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी गस्त घालीत आहे. त्यांच्या गस्तीने परिसरात सर्वत्र गाड्यांमुळे उडणारी धूळ दिसून येत आहे. जोपर्यंत तो नरभक्षक वाघ जेरबंद होत नाही, तोपर्यंत या वाघाची दहशत या परिसरात राहणार असल्याने गावकरी चिंतेत आहेत. या भीतीपोटीच अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामे ठप्प पडलेली आहेत. यात त्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)