कधी थांबणार ग्रंथांची महोत्सवी उपेक्षा?
By Admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:06+5:302015-02-14T23:51:06+5:30
औरंगाबाद : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्फे घेण्यात येणारा जिल्हा ग्रंथ महोत्सव दरसालप्रमाणे यथासांग पार पडला. विविध सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिकांच्या मुलाखती यांची रेलचेल, विद्यार्थ्यांसाठी अनेकविध स्पर्धा साजर्या झाल्या.
औ ंगाबाद : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्फे घेण्यात येणारा जिल्हा ग्रंथ महोत्सव दरसालप्रमाणे यथासांग पार पडला. विविध सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिकांच्या मुलाखती यांची रेलचेल, विद्यार्थ्यांसाठी अनेकविध स्पर्धा साजर्या झाल्या. मात्र महोत्सवाचा मूळ उद्देश होता ग्रंथांची ओळख आणि विक्री. हा हेतू मात्र, कुठेतरी हरवल्याचे चित्र होते. तीन दिवसांत शहरभरातील पालक व विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेटी देणे अपेक्षित होते. मात्र, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या शाळकरी मुलांव्यतिरिक्त कोणीही आवर्जून इकडे फिरकले नाही. या महोत्सवाची पुरेशी प्रसिद्धी करण्याची तसदीच शासनाकडून घेतली गेली नसल्याची भावना एका स्टॉलधारकाने बोलून दाखविली. सर्व साधन-सुविधा असताना अनेकदा केवळ संवेदनशीलता व कल्पकतेचा अभाव ही आपल्या शासकीय कार्यपद्धतीची ओळख आहे. लालफितीतला कारभार या नावाने प्रसिद्ध असणारा हा एकूण व्यवहार वाचन संस्कृतीच्या प्रवाहीपणाला फारसा पुढे नेऊ शकला नाही. वाचक पुस्तकांपर्यंत पोहोचला नाही; तर पुस्तकेच वाचकोंपर्यंत पोहोचतील याचे प्रयत्न व्हावे लागतात. आधुनिक तंत्रयुगातील माध्यमांचा प्रभावी वापर करत अधिक संवादी बनणे सहज शक्य आहे. या महोत्सवाचे स्वरूप केवळ उत्सवी होत असल्याचेच ठळकपणे जाणवते आहे. दीर्घकाळ मनात रुजणारे वाचनवेड या महोत्सवातून कोवळ्या वयाला मिळायला हवे. मात्र, तीन दिवसांचा आनंदोत्सव, स्पर्धा, बक्षिसे यांच्यापलीकडे जाण्यात महोत्सव अपयशी ठरला. भाषणे, व्याख्याने यातून प्रसंग साजरा केल्याचे तात्पुरते समाधान मिळते. मात्र, उद्याचा वाचक घडवायचा, टिकवायचा असेल तर काही अधिक विचारीपणे व्हायला हवे. निमंत्रित साहित्यिक सोडले तर शहरातील एकही ज्येष्ठ वा नव्या दमाचा साहित्यिक-कवी महोत्सवात फिरकला नाही. नव्या पिढीशी जोडून घेत त्यांच्या हाती अक्षरठेवा सोपविण्याची ही संधी त्यांना का मोलाची वाटली नाही? शेवटी काय तर, ऐकलेले शब्द वार्यावर विरून जातील कालांतराने. मात्र, कुणीतरी वाचावे म्हणून कुणी लिहिलेली अक्षरे दीर्घकाळ सोबत करतात. त्या अक्षरांना एकाकीपणापासून वाचवायला हवे, त्यासाठी वाचायला हवे, नाही का?