ब्युटी पार्लरमध्ये जाताय?- सांभाळा, इन्फेक्शन होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 03:23 PM2017-09-02T15:23:14+5:302017-09-02T15:24:15+5:30
ब्युटी पार्लरमध्ये हल्ली मुली सर्रास जातात, पण सौंदर्य सोडाच, आजारपण सोबत येतंय का हे तपासा. अमेरिकन सिंगर पॉला अब्दुलला पार्लरमध्ये इन्फेक्शन
नेहा चढ्ढा
ब्युटी पार्लरमध्ये आपण कशासाठी जातो तर सुंदर दिसावं म्हणून. पण समजा, सुंदर दिसण्याऐवजी काही इन्फेक्शन झालं तर? होऊ शकतंच. अलिकडेच अमेरिकन सिंगर पॉला अब्दुल हिच्या अंगठय़ाला मोठं इन्फेक्शन झाल्याची आणि तो ठणकत असल्याची बातमी जगभर पसरली. पॉला लॉँज एंजेलिसच्या एका नेल सलोनमध्ये नेल आर्ट करुन घ्यायला गेली होती. ते राहिलं बाजूलाच, सोबत हे अंगठय़ाचं इन्फेक्शन मात्र आलं. हे जर अमेरिकेत होऊ शकतं तर आपल्याकडचे पार्लर आठवा, तिथली स्वच्छता पहा, नाहीतर असं इन्फेक्शन आपल्याही वाटय़ाला येऊच शकतं.
ब्युटीपार्लर गल्लीबोळात दिसतात, पण त्याचं काही स्टॅण्डर्ड, आरोग्याचे नियम असं काहीही आपल्याकडे नाही.त्यात स्वच्छतेचाही आनंद. वॅक्स करताना घाणेरडय़ा त्याच त्या स्ट्रीप्स पुन्हा पुन्हा वापरल्या जातात. काह ठिकाणी तर फेशियल करताना जे फडके चेहरा पुसायला वापरतात ते अस्वच्छ असतं. एकाच पाण्यात पुन्हा पुन्हा ते कापड बुचकळलं जातं. पार्लरमध्ये घालायला म्हणून जे गाऊन देतात ते ही अनेकदा अस्वच्छ असतात. धुतलेले नसतात. आणि हे सारं आपण पैसे मोजून जर करुन घेत असू तर सोबत आजारपण आलं तर काय भावात पडेल?
पण असं होतं अस्वच्छ पाणी, घाणेरडे फडके, अनेक लोकांनी वारंवार वापरलेले कपडे यातून आपल्याला अनेक साथीचे आजार होऊ शकतात. एवढंच नव्हे तर हिपेटायटिस बी आणि सी चंही इन्फेक्शन होऊ शकतं.
त्यामुळे आपणच सावध राहून योग्य पार्लरची निवड केली पाहिजे.
पार्लरमध्ये जाताना.
1) पार्लर किती स्वच्छ आहे हे पहा.
2) घाणेरडे, दुसर्यानं वापरलेले टॉवेल वापरणार नाही हे स्पष्ट सांगा. कुठला वापरणार तो दाखवण्याची मागणी करा.
3) वॅक्स, फेशियलसाठी जी भांडी वापरणार, जे कापड वापरणार ते स्वच्छ आहे की नाही बघा.
4) शक्यतो त्वचेला इजा होईल असं काही पार्लरमध्ये करू नका.