व्यापक पातळीवर मराठीचा विकास, संवर्धन व्हावे (भाग १)
By admin | Published: February 11, 2015 11:19 PM2015-02-11T23:19:48+5:302015-02-11T23:19:48+5:30
- मराठी भाषा विभागातर्फे चर्चासत्र : भाषा तज्ज्ञांच्या सूचनांचा विचार करणार
Next
- राठी भाषा विभागातर्फे चर्चासत्र : भाषा तज्ज्ञांच्या सूचनांचा विचार करणार नागपूर : राज्याचे मराठी भाषाविषयक धोरण कसे असावे, याचा मसुदा मराठी भाषा सल्लागार समितीच्या वतीने डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली तयार केला. हे धोरण अमलात येण्यापूर्वी ते सर्वसमावेशक असावे आणि मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगात यावे म्हणून समितीने तयार केलेल्या मसुद्यातील उणिवा आणि सूचनांवर भाषा समिती काम करते आहे. या शृंखलेत बुधवारी समितीने डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या उपस्थितीत भाषातज्ज्ञांशी सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी मान्यवरांनी विविध उपयोगी सूचनांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही व्यापक पातळीवर मराठीचा विकास होण्यासाठी काही सूचना केल्या. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग व भाषा संचालनालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा स्नातकोत्तर मराठी विभाग व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन बाबूराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले होते. मराठी भाषा संवर्धन आणि सुधारणा यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असणे आवश्यक असल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले. मराठी विद्यापीठाची स्थापना झाल्यास विविध ज्ञानशाखा मराठीत आणणे शक्य होईल आणि त्यामुळे मराठी ज्ञानभाषा होईल. मराठी ज्ञानभाषा झाली तर त्यात रोजगारांचीही निर्मिती होऊ शकेल. उपयोजित मराठी उपयोगात आणण्यासाठी काही उपाययोजनाही यावेळी मान्यवरांनी सांगितल्या. मराठी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी शासनाने विचारपूर्वक पाऊल उचलल्याशिवाय मराठी शाळांची दुरवस्था सुधारणार नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले. वेगवेगळ्या भाषेतील लोक लिहिते झाले पाहिजे, याप्रकारेच मराठी भाषेचा दर्जा सुधारण्यास हातभार लागेल, अशी विविध अंगाने चर्चा यावेळी झाली. राज्याचे मराठी भाषाविषयक धोरण निश्चित करण्यासाठी ज्येष्ठ समीक्षक आणि ८६ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली भाषा सल्लागार समिती तयार करण्यात आली. या समितीतर्फे भाषा धोरणाचा मसुदा शासनाकडे सादर केला जाणार आहे. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि.स. जोग, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, प्रा.डॉ. प्रमोद मुनघाटे, भाषा सल्लागार समितीचे सदस्य यांच्यासह शहरातील भाषातज्ज्ञ, संशोधक व अभ्यासक उपस्थित होते.