फ्रेण्डशिप डे चं प्लॅनिंग करताय?- या घ्या काही प्लॅनिंगच्या आयडिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:14 PM2017-08-02T16:14:43+5:302017-08-02T16:16:11+5:30
येत्या रविवारच्या फ्रेण्डशिप डेचं सेलिब्रेशनचं काय प्लॅनिंग करताय?
यंदाचा पहिला डे म्हणजे फ्रेण्डशिप डे, येत्या रविवारी येतोय. त्याची तयारी तुम्ही करत असाल तर काही गोष्टी हाताशी असलेल्या बर्या! फ्रेण्डशिप डे निमित्त छान नट्टापट्टा तर करायलाच हवा. मग या तरुणींचा ब्युटी पार्लरकडे मोर्चा वळेलच. मग वॅक्सिंगपासून क्लिनअप, फेशियल हे सारं सारं केल जाईल. ‘डे’ज चे हे फॅड पूर्वीपासून असले तरी ट्रेण्डी आणि फॅशनेबल दिसण्यासाठी बर्याच जणींनी ब्युटी सलूनमध्ये धाव घेणे साहजिकच आहे. मग केसांना कलर करणे, हेअर स्ट्रेटनिंग करणे, हातांना मेहंदी किंवा दंडावर टॅटू करणे, नेल आर्ट, मॅन्यूकेअर, पॅडिक्यूअर हेही करतात अनेकजणी. करायला अर्थातच हरकत नाही. बजेटची तेवढी काळजी घ्या.
पण वेगळी काही फॅशन करायची असेल तर पायांतील पैंजण, नाकातील ट्रेण्डी नथनी, गळ्यात कपडय़ांवर साजतील अशा माळा, हे सारं जमवून ठेवा. रेट्रो लूक सध्या हीट आहे.तेव्हा बर्याच जणींनी हेअरबॅण्ड, रब्बरबॅण्ड जमवून ठेवा.
इतका नट्टापट्टा करून तयार होऊन कॉलेजमध्ये जायचे, मित्र-मैत्रिणींमध्ये भाव खायचा आणि फोटोतर काढायलाच हवा ना. ‘सेल्फि’च्या आधीच्या काळातील तरुण-तरुणी आपापल्या ग्रुपसोबत एखाद्या जवळच्याच स्टुडियोमध्ये जाऊन फोटो काढून घ्यायचे. ही आठवण सर्वाकडेच राहावी आणि वयात आलेल्या तरुणींना लग्नासाठी काही फोटो असावेत म्हणून पोट्रेट फोटोही काढले जायचे. मात्र आत्ताच्या या ‘सेल्फी’ जमान्यात प्रत्येकाकडेच अॅण्ड्रॉइड मोबाईल असल्यामुळे काढ फोटो टाक फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अशी पद्धत रुढ होत चालली आहे. त्यामुळे आपल्या छान छान फोटोंना भरपूर लाईक्स मिळावे आणि मस्त डिपी ठेवता यावा यासाठीही तयारी केलेली बरी!
बर आता कॉलेजच्या संपूर्ण वेळात ‘डे’ साजरा तर केला. मग इतके सजून धजून काय लगेच घरी जायचे का?
मस्त सिनेमाला जा, पिकनिकला जा. हॉटेलात जेवायला जा. एखाद्या मित्रमैत्रिणीच्या घरी गेट टुगेदर करा.
पण हे सारं करताना घरच्यांची परवानगी घ्या. त्यांना सांगा. आणि कुठलीही आगाऊ रिस्क न घेता आनंदानं आपला दिवस साजरा करा.
प्लॅनिंग करायचं ते याचसाठी की, आपला दिवस आनंदी आणि उत्साही असेल आणि यादगारही होईल!