प्लास्टिकची पिशवी आपण नाहीच वापरली तर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 05:09 PM2017-08-31T17:09:33+5:302017-08-31T17:10:27+5:30
झाडं लावणं, जगवणं,प्लास्टिक न वापरणं हे सारं आपण स्वतःपासून कधी सुरु करणार?
- अर्चना पाटील
एक झाड लाऊ मित्रा , त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू ! हे गाण्याचे बोल चिन्मयच्या तोंडात ऐकले आणि त्या चार ओळीत कीती मोठा संदेश आहे हे जाणवले. बालकनीत तुळशीला पाणी टाकत असताना शाळेची प्रभातफेरी दिसली तर तेथेही मुलींची घोषणा होती, कावळा करतो कावकाव,माणसा माणसा झाडे लाव. नकळतच मनात एक प्रश्न येऊन गेला की प्राचीन काळरत वृक्षारोपण अभियान राबवले असतील का? -नाही. मग आजच्या काळात आपल्याला लोकांना क्षणोक्षणी जाणीव करून द्यावी लागते की वृक्ष आपले मित्न आहेत. त्यांची लागवड करा. असं का?याला जबाबदार कोण? आपणच! पाऊस पडला नाही की शेतकर्यांची होणारी तगमग, उन्हाळ्यात तापमानाचा वाढणारा पारा, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे वाढणारे प्रमाण, पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल पायी फिरणार्या स्त्रिया ही परिस्थिती कोणी निर्माण केली तर आपण. त्यामुळे त्यावर उपाययोजनाही करणार आपणच. त्यातला प्रमुख उपाय आहे वृक्षारोपण.
एक दिवस आपली टेरेसवरची पाण्याची टाकी सकाळीच रिकामी झाली आणि दिवसभर वीजपुरवठाही खंडीत झाला तर आपण दिवसभर पाणीपाणी करतो. त्याचप्रमाणे आपल्या जमिनीत मुरणार्या पाण्याच्या टाक्या भरल्या नाहीत तर आपले काय होईल याचा विचार तर करा.
घरात बसून मी माझ्या देशासाठी काय करू शकते असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो त्यावेळी उत्तरं मिळतात, तुम्ही विनाकारण चालू असलेला नळ बंद करा. घरात विनाकारण चालणारे लाईट्स आणि फॅन बंद करा. केवळ आपले घरच स्वच्छ न करता आपल्या आजूबाजूचा परीसर स्वच्छ करा. अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपण देशाची सेवाच करतो.
मी रोजच्या रूटीनपेक्षा काहीतरी वेगळे जाणूनबुजून करते आहे ही भावना नक्कीच तुम्हाला आनंद देऊन जाईल. त्यात वृक्षारोपण हा असा छंद आहे की तो वयाच्या कोणत्याही टप्प्यावर जोपासता येतो. विशेष म्हणजे या छंदासाठी तुम्हाला द्यावा लागतो तो केवळ तुमचा वेळ आणि थोडेसे कष्ट. काही छंद हे आपल्या आवडीनुसार आपण निवडत असतो तर काळाची गरज म्हणून एखादा छंद आपण आपल्या भावी पिढीसाठी निवडून पाहूया. आपल्या आजूबाजूला खुप काही गोष्टी घडत असतात पण आपण आपले कान - डोळे बंद करून आपल्याच विश्वात रममाण असतो. या स्वार्थीपणाच्या चादरीतून बाहेर निघण्याची गरज आहे . शासन प्लँस्टीक पिशवीवर बंदी आणेल तेव्हाच आपण ती वापरणे बंद करणे गरजेचे आहे का? आपल्या मनानेच आपण प्लँस्टीक पिशवी टाळणे आधिक योग्य आहे. आपण निदान सुरुवात तर करू स्वतःपासून!