प्रभाग आरक्षणावेळी एसटींवर अन्याय नाही
By Admin | Published: September 28, 2015 02:04 AM2015-09-28T02:04:28+5:302015-09-28T03:01:19+5:30
विनय तेंडुलकर : लोकसंख्येचा विचार करून सरकारचा निर्णय
पणजी : राज्यातील अकरा पालिकांच्या प्रभागांचे आरक्षण करताना सरकारने अनुसूचित जमातींवर (एसटी) अन्याय केलेला नाही, असे निवेदन भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.
तेंडुलकर म्हणाले, की सरकारने प्रभाग आरक्षण करताना कुठच्याच समाजावर अन्याय केलेला नाही. आम्ही कुणीच प्रभाग आरक्षण प्रक्रियेत हस्तक्षेपही केला नाही. भाजपच्या कार्यालयातून अधिकार्यांना कुणी फोन केला नाही किंवा आपणही फोन केला नाही. एसटी समाजाची लोकसंख्या ज्या पालिका क्षेत्रांमध्ये पुरेशी आहे, त्या पालिका क्षेत्रांमध्ये एसटींना आरक्षण दिले गेले. काँग्रेस सरकारच्या काळात मात्र लोकसंख्येचा किंचितही विचार न करता वा?ेल तिथे प्रभाग आरक्षित केले गेले होते.
तेंडुलकर म्हणाले, की आरक्षणाच्या विषयावरून लोकांत मोठा असंतोष आहे, असे चित्र प्रसारमाध्यमांमधून विरोधी राजकीय पक्ष व काही वैफल्यग्रस्त नेते उगाच निर्माण करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर पालिका निवडणुकीवेळी एकाही प्रभागात स्वत:च्या कार्यकर्त्यास जिंकून आणू शकणार नाही. पालिका प्रभागांची फेररचना व आरक्षण हे प्रथमच खूप चांगल्या प्रकारे झाले आहे. विद्यमान सरकारने प्रथमच अनुसूचित जातींना (एससी) म्हापसा, पेडणे व वास्को या पालिका क्षेत्रांमध्ये प्रभाग आरक्षित केले.
तेंडुलकर म्हणाले, जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी एसटींना सरकारने 12 टक्के प्रभाग आरक्षित करून दिले होते. कारण, जिल्हा पंचायत क्षेत्रात येणार्या खेड्यापाड्यांमध्ये एसटी समाजातील अनेक लोक राहतात. शहरी भागात एसटी समाजातील लोक जास्त नाहीत.
तेंडुलकर म्हणाले, की पालिका निवडणूक ही भाजपकडून विद्यमान सरकारच्या कामगिरीच्या आधारे व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बळावरच लढवली जाईल. आमच्या सरकारने केलेले काम आम्ही लोकांसमोर ठेवू. सर्व पालिका क्षेत्रांमध्ये बहुसंख्य भाजप कार्यकर्तेच निवडून येतील.
(खास प्रतिनिधी)