मुंबई : ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता फेरीतून सहा संघांनी मुख्य फेरीत प्रवेश केला. ओमान हा या मुख्य फेरीत प्रवेश मिळवणारा अंतिम संघ ठरला. ओमानच्या शिक्कामोर्तबानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम 16 संघ निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया स्पर्धेतील सहभागी होणारे संघ आणि वेळापत्रक...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय पुरुष संघाला गट क्रमांक 2 मध्ये देण्यात आले आहे. 2011च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंनतर भारत आणि पाकिस्तान हे आयसीसीच्या स्पर्धेत प्रथमच साखळी गटात एकमेकांसमोर येणार नाहीत. पाकिस्तानला गट क्रमांक 1 मध्ये स्थान देण्यात आले आहे. 2011नंतर आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत-पाक पाचवेळा समोरासमोर आले आणि 2019च्या वर्ल्ड कपमध्येही ते एकमेकांना भिडणार आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये उभय संघ साखळीत समोरासमोर येण्याची शक्यता नाही.
भारत - पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींप्रमाणे इंग्लंड व ऑस्ट्रेलिया हेही एकेमकांसमोर येण्याची शक्यता कमीच आहे. इंग्लंडला गट क्रमांक 2 मध्ये, तर ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान एकाच गटात आहेत. क्रमवारीतील अव्वल आठ संघ मुख्य फेरीसाठी थेट पात्र ठरले आहेत, तर माजी विजेत्या श्रीलंका संघाला बांगलादेशसह साखळी फेरीत खेळावे लागेल. 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या या स्पर्धेत 12 संघांमध्ये जेतेपदाची चुरस रंगणार आहे. जागतिक क्रमवारीनुसार अव्वल दहा संघ आधीच निश्चित झाले आहेत. पण, यातील नवव्या व दहाव्या स्थानावरील संघ सुपर बाराच्या उर्वरित चार स्थानांसाठी अन्य 6 संघांविरुद्ध खेळेल.
- सुपर 12 मध्ये प्रवेश निश्चित असलेले संघ कोणते
पाकिस्तान, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया ( यजमान) , दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान
- सुपर बारासाठीच्या चार जागांसाठी कोणार चुरस ( या संघांची A व B गटात विभागणी )
श्रीलंका, बांगलादेश, पापुआ न्यू गिनी, नामिबिया, नेदरलँड्स, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान
असे आहेत दोन गट
गट 1 - पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, गट A विजेता, गट B उप-विजेता
गट 2- भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, गट A उप-विजेता, गट B विजेता
असे असतील भारताचे सामने
24 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण अफ्रीका (पर्थ स्टेडियम)
29 ऑक्टोबर - भारत वि. पात्रता गट 2 (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
1 नोव्हेंबर - भारत वि. इंग्लंड (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
5 नोव्हेंबर - भारत वि. पात्रता गट B1 (एडिलेड ओव्हल)
8 नोव्हेंबर - भारत वि. अफगाणिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
उपांत्य फेरी
11 नोव्हेंबर – पहिली उपांत्य फेरी (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
12 नोव्हेंबर – दुसरी उपांत्य फेरी (एडिलेड ओव्हल)
अंतिम सामना
15 नोव्हेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
Web Title: The 16 teams that will play in the ICC Men's T20 World Cup 2020; Know time table, group, date, venue
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.