Join us  

AFG vs SA Semi Final : ऐतिहासिक! दक्षिण आफ्रिका प्रथमच वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये; ८.५ षटकांत सामना जिंकला

AFG vs SA T20 World Cup 2024 Semi-final Live Match : दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा दारूण पराभव करून प्रथमच विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 7:45 AM

Open in App

AFG vs SA T20 World Cup 2024 Semi-final : एडन मार्करमच्या नेतृत्वातील दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा दारूण पराभव करून विश्वचषकाच्या फायनलचे तिकीट मिळवले. खरे तर प्रथमच आफ्रिकेच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. यंदाच्या विश्वचषकात सुरुवातीपासून चमकदार कामगिरी करून उपांत्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाला पहिल्या उपांत्य सामन्यात काहीच खास करता आले नाही. त्यांचा संघ अवघ्या ५६ धावांत गारद झाल्याने दक्षिण आफ्रिकेला प्रथमच विश्वचषकाच्या फायनलमध्ये जाण्याची सुवर्णसंधी चालून आली. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी केवळ ५७ धावांची आवश्यकता होती. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवला गेला. (AFG vs SA Live Match)

अफगाणिस्तानने दिलेल्या ५७ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने ८.५ षटकांत १ बाद ६० धावा केल्या. यासह आफ्रिकेने ९ गडी आणि ६७ चेंडू राखून विजय साकारला. क्विंटन डीकॉक (५) धावा करून बाद झाला, तर रेजा हेन्ड्रिक्स (नाबाद २९ धावा) आणि कर्णधार एडन मार्करमने नाबाद २३ धावा करून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने यंदाच्या विश्वचषकातील त्यांचे सातपैकी सात सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. आजच्या या महत्त्वाच्या सामन्यात त्यांच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी केली, तर फलंदाज एडन मार्करम आणि रिजा हेन्ड्रिक्स यांनी दाखवलेल्या संयमामुळे त्यांना अंतिम फेरीचे तिकीट मिळाले आहे. आज रात्री भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरी २ हा सामना होणार आहे. यातील विजयी संघ दक्षिण आफ्रिकेसोबत २९ जून रोजी बारबाडोस येथे किताबासाठी मैदानात असेल. 

अफगाणिस्तान अवघ्या ५६ धावांत गारद

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ ११.५ षटकांत ५६ धावांत सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेन आणि तबरेझ शम्सी यांनी सर्वाधिक ३-३ बळी घेतले. याशिवाय कगिसो रबाडा आणि एनरिक नॉर्तजे यांनी प्रत्येकी २-२ बळी घेऊन अफगाणिस्तानच्या फलंदाजीची कंबर मोडली. तर अफगाणिस्तानकडून अजमतुल्लाह उमरजईने सर्वाधिक १० धावा केल्या. उमरजई हा अफगाणिस्तानच्या संघासाठी दुहेरी आकडा पार करणारा एकमेव फलंदाज ठरला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या घातक गोलंदाजीसमोर कोणत्याच फलंदाजाचा टिकाव लागला नाही. अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरबाज (०), इब्राहिम झादरान (२), गुलाबदीन नायब (९), अजमतुल्लाह उमरजई (१०), मोहम्मद नबी (०), नांगेलिया खरोटे (२), करीम जनत (८), राशिद खान (८), नूर अहमद (०), नवीन-उल-हक (२) आणि फझलहक फारूकीने नाबाद २ धावा केल्या. याशिवाय १३ अतिरिक्त धावांच्या जोरावर अफगाणिस्तानने ५० हून अधिक धावा उभारल्या. 

अफगाणिस्तानचा संघ - राशिद खान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, अजमतुल्लाह उमरजई, गुलाबदीन नायब, मोहम्मद नबी, करीम जनत, नांगेयालिया खारोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारूकी. 

दक्षिण आफ्रिकेचा संघ -एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डीकॉक, रिजा हेन्ड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्तजे, तबरेज शम्सी. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024द. आफ्रिकाअफगाणिस्तान