पाकिस्तानात पुढील वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पिअन्स ट्रॉफी होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत संभ्रम होता. पाकिस्तानी माजी खेळाडू भारताला इशारे देत दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. पीसीबीने तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली होती. एवढे करूनही आज बीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही असे आयसीसीला कळवून टाकले आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार BCCI ने ICC ला याची माहिती दिली आहे. भारत सरकारने बीसीसीआयला आपली टीम पाकिस्तानात न पाठविण्याचा सल्ला दिल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये ८ संघ सहभागी होणार आहेत. याचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले होते. परंतू, भारताशिवाय या स्पर्धेला काहीच महत्व नाही हे पाकिस्तान आणि आयसीसीलाही माहिती होते. यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत भारतावर दबाव टाकण्याचे काम पाकिस्तान करत होते. पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या टीमवर दहशतवादी हल्ला झाला होता, ही बाब अद्याप क्रिकेटविश्व विसरू शकलेले नाही.
भारतीय संघ पाकिस्तानात खेळला तर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला चांगली कमाई होणार होती. गेल्या काही वर्षांपासून उभयतांत स्पर्धा न झाल्याने पीसीबीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे पाकिस्तानला भारतीय संघ पाकिस्तानात खेळताना हवा होता. याला भारताने स्पष्ट नकार दिला आहे.
भारताने पाकिस्तानात संघ पाठविण्यास नकार दिल्याने आता भारतीय संघाचे सामने हे हायब्रिड मॉडेलद्वारे राबविण्याशिवाय आयसीसी व पाकिस्तानकडे पर्याय राहिलेला नाही. भारताने यासाठी पसंतीचे ठिकाण दुबई असल्याचे म्हटले आहे. तर गेल्यावेळेप्रमाणे श्रीलंकेत हे सामने होऊ शकतात. परंतू, अंतराच्या दृष्टीने युएई सोईचा असल्याचे सांगितले जात आहे.