Join us  

विराट-रोहितच्या चाहत्यांना खुशखबर; BCCI सचिव जय शाह यांनी सांगितलं भारताचं पुढील 'लक्ष्य'!

BCCI secretary jay shah : बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टीम इंडियाचे पुढील लक्ष्य सांगितले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 9:56 AM

Open in App

भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकताच बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टीम इंडियाचे पुढील लक्ष्य सांगितले आहे. आगामी काळात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल त्यांनी भाष्य केले आहे. खरे तर ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानात होणार आहे. ज्यापद्धतीने भारतीय संघ कामगिरी करत आहे हे पाहता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (WTC) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे आमचे ध्येय असल्याचे जय शाह यांनी सांगितले. तसेच यावेळी वरिष्ठ खेळाडू देखील संघाचा भाग असतील असे त्यांनी स्पष्ट केले. 

दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून भारताने विश्वचषक उंचावला. या विजयासह भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांनी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. रोहितने संपूर्ण विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली. तर विराटने अंतिम सामन्यात संघ अडचणीत असताना ७६ धावांची खेळी करून सामनावीर पुरस्कार पटकावला. याशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजानेही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. 

WTC आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले की, मागील विश्वचषकात जो कर्णधार होता तोच आज इथे बार्बाडोसमध्ये आहे. २०२३ च्या विश्वचषकातील अंतिम सामना वगळता आम्ही सर्व सामने जिंकलो. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने चांगली कामगिरी केली. रोहित आणि विराट हे दोघे खूप अनुभवी खेळाडू आहेत. अनुभवाच्या बाबतीत त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. रोहितचा स्ट्राईक रेट कित्येक युवा खेळाडूंपेक्षा सरस आहे हे आपण पाहिले. टीम इंडियाने सर्वच किताब जिंकावेत असे मला वाटते. आपल्याकडे चांगल्या खेळाडूंची मोठी फळी आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि WTC साठी वरिष्ठ खेळाडू संघाचा भाग असतील. ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या संघातील केवळ तीन खेळाडू झिम्बाब्वे दौऱ्यावर जात आहेत. जर गरज भासल्यास आपण तीन वेगवेगळे संघ तयार करू शकतो. जय शाह PTI या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

टॅग्स :जय शाहभारतीय क्रिकेट संघजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धारोहित शर्माबीसीसीआय