भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्यातील वन डे मालिकेत सपाटून मार खावा लागला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताच्या गोलंदाजांनी सर्वात निराशाजनक कामगिरी केली. भारतीय संघाच्या या अपयशाचा फटका खेळाडूंना आयसीसीच्या वन डे क्रमवारीत बसला आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला वन डे क्रमवारीतील गोलंदाजांमधील अव्वल स्थान गमवावे लागले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत तीनही सामने खेळूनही बुमराहला एकही विकेट घेता आली नाही आणि त्यानं धावाही भरपूर दिल्या. त्यामुळे गोलंदाजांच्या क्रमवारीत त्याच्या खात्यातील 35 गुण कमी झाले.
न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला एकही विकेट घेता न येणं हे संघाच्या अपयशाचं प्रमुख कारण.. बुमराहनं तीन सामन्यांत 167 धावा दिल्या. त्यामुळे त्याची क्रमवारीत घसरण झाली. बुमराह आता 719 गुणांसह दुसऱ्या स्थानी आला आहे.न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट 727 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. टॉप टेन गोलंदाजांमध्ये बुमराह वगळता भारताचा एकही खेळाडू नाही.
फलंदाजांमध्ये विराट कोहली ( 869) आणि रोहित शर्मा ( 855) यांनी अव्वल दोन स्थानावरील मक्तेदारी कायम राखली आहे. भारतीय गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या रॉस टेलरनं एक स्थान वर झेप घेत चौथा क्रमांक पटकावला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉकही आठव्या स्थानावरून एक क्रमांक वर सरकला आहे.
लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांची मोठी झेप...
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत लोकेश राहुलनं दुहेरी जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. त्यानं यष्टिंमागे अचुक कामगिरी करताना फलंदाजीत संघातील स्थान आणखी मजबूत केलं आहे. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास आपण तयार आहोत, याची प्रचिती त्यानं या मालिकेत दिली. त्यानं वन डे मालिकेत 1 शतक आणि 1 अर्धशतकाच्या जोरावर 204 धावा केल्या. यष्टिंमागे एक कॅच व एक स्टम्पिंगही केले. त्याच्या जोडीला फलंदाजीत श्रेयस अय्यरनेही आपली छाप पाडली. मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत श्रेयसनं अव्वल स्थान पटकावलं. लोकेश 49 स्थानावरून 36व्या, तर श्रेयस 85 स्थानावरून 62व्या स्थानावर आला आहे.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजानं तीन स्थानांच्या सुधारणेसह सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
Web Title: Breaking: Jasprit Bumrah lost number one position in ICC ODI ranking for bowlers after the series against New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.