वन डे मालिकेपूर्वी कोरोना संकटामुळे इंग्लंडला संपूर्ण संघ बदलावा लागला. त्यात पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडनं पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. पाकिस्तानचा अनुभवी संघ वरचढ ठरेल, असे वाटत होते. पण, घडले उलटेच. साकिब महमूदनं पहिल्याच षटकात पाकिस्तानला दोन धक्के दिले आणि बघता बघता पाकिस्तानचा संपूर्ण संघ १४१ धावांत तंबूत परतला. डेवीड मलान ( नाबाद ६८) आणि झॅ क्राऊली ( नाबाद ५८) यांनी १२० धावांची भागीदारी करताना संघाला २१.५ षटकांत विजय मिळवून दिला. इंग्लंडनं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) आणि शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
शोएब अख्तरनं एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,'' इंग्लंडच्या साकिब महमूदने चांगली गोलंदाजी केली. पाकिस्तानी संघात पहिल्यासारखं टॅलेंट राहिलेलं नाही. बाबर आजम आणि फखर जमान खेळले नाही, तर संघ १५० धावाही बनवू शकत नाही. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या चुकीच्या पॉलिसी व निवडीमुळे ही अवस्था झाली आहे. संघात असा एकही खेळाडू नाही की ज्याच्यासाठी पैसे देऊन मॅच पाहावी. लोकं आता पाकिस्तानचा सामनाच बघणे बंद करतील.''
पाकिस्तानचे माजी खेळाडू रमीज राजा यांनीही संताप व्यक्त केला. ते म्हणाले,''एक कमकुवत संघ म्हणून जगासमोर पाकिस्तान संघाला उभं करता येऊ शकतं. इंग्लंडच्या बी संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. हे फलंदाज पहिल्यांदाज इंग्लंडमध्ये खेळतायेत असे वाटत होते.''
शाहिद आफ्रिदी म्हणाला,''लवकरात लवकर हा सामना विसरण्याची गरज आहे. पाकिस्तानी संघ निश्चितच इतका खराब नाही, लॉर्ड्सवर दमदार कमबॅक करा. इंग्लंडनं नव्या दमाच्या खेळाडूंसह दमदार खेळ केला.''
Web Title: ENG vs PAK : Shahid Afridi & Shoaib Akhtar furious after pakistan humiliating defeat, said now people are stopping watchin cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.