मुंबई , आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा : अॅशेस 2019च्या हंगामापासून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरूवात झाली. कसोटी क्रिकेटला पुन्हा संजीवणी देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. अॅशेस मालिकेपाठोपाठ भारत वि. वेस्ट इंडिज आणि श्रीलंका वि. न्यूझीलंड अशा मालिका झाल्या. रविवारी इंग्लंडने अॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटीतील अखेरचा सामना जिंकून मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेनंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेतील टीम इंडियाचे अव्वल स्थान कायम आहे. विशेष म्हणजे भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी दोन कसोटी जिंकले आहेत, तरीही भारत अव्वल कसा, चला जाणून घेऊया...
यजमान इंग्लंडने पाचव्या कसोटी सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाविरुद्धची अॅशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने रविवारी अॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 135 धावांनी पराभव केला. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 399 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 263 धावांत संपुष्टात आला. ब्रॉड व जॅक लिच यांनी चार बळी मिळवले. एक वर्षाच्या बंदीनंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात कमबॅक केलेल्या स्टीव्ह स्मिथनं या मालिकेत एकहाती दबदबा राखला. पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली नसली तरी मालिकेत सर्वाधिक 774 धावांचा विक्रम त्यानं नावावर केला.
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला अॅशेस मालिकेतून सुरुवात झाली. 2 वर्ष चालणाऱ्या या स्पर्धेत अव्वल 9 संघांमध्ये एकूण 27 कसोटी मालिकेत 72 सामने होणार आहेत आणि त्यानंतर अव्वल दोन संघांमध्या जेतेपदाचा सामना होणार आहे. 1 ऑगस्ट 2019 पासून या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेनुसार अव्वल 9 संघ पुढील दोन वर्षांत होम-अवेय अशा प्रत्येकी तीन-तीन कसोटी मालिका खेळणार आहेत. अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे जेतेपदाचा सामना होईला आणि विजेत्या संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मान मिळेल.
कोण किती सामने खेळणार ?
या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे संघ पात्र ठरले आहेत. या स्पर्धेंतर्गत इंग्लंड 22 सामने खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( 19), भारत ( 18), दक्षिण आफ्रिका ( 16), वेस्ट इंडिज ( 15), न्यूझीलंड ( 14), बांगलादेश ( 14), पाकिस्तान ( 13) आणि श्रीलंका (13) यांचा क्रमांक येतो.
कशी होणार गुणांची विभागणी?
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येक मालिकेत 120 गुण देण्यात येणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची मालिका होणार आहे. त्यामुळे 120 गुणांची दोन सामन्यांत विभागणी होईल. त्यानुसार भायतीय संघाने दोन्ही सामने जिंकून खात्यात 120 गुण जमा केले आहेत.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयी संघाला 40 गुण मिळतील. अनिर्णित व बरोबरीच्या निकालांसाठी दोन्ही संघांना प्रत्येकी अनुक्रमे 13.3 व 20 गुण दिले जातील. 4 सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 30 गुण घेईल, तर अनिर्णित निकालासाठी 10 व बरोबरीच्या निकालासाठी 15 गुण मिळतील. पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 24, अनिर्णित निकाल 8 आणि बरोबरीच्या निकालासाठी 12 गुण मिळतील. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांना दोन विजय आणि एक अनिर्णित निकालानंतर प्रत्येकी 56 गुणांसह अनुक्रमे पाचव्या व चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका प्रत्येकी 60 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.
Web Title: ICC World Test Championship : India, Australia and England each team won two test, but Team India remains top; know how?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.