रिषभ पंत अपयशी ठरत असल्यामुळे कर्णधार विराट कोहलीनं यष्टिमागे लोकेश राहुलला उभं केलं. या प्रयोग यशस्वी ठरला आणि त्यामुळे मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर संजू सॅमसनला संधी मिळाली. पण, सॅमसनला त्याचं सोनं करता आलं नाही. त्यामुळे चाहत्यांनी महेंद्रसिंग धोनीला साद घातली.
केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत नाणेफेकीला आलेल्या टीम साउदीनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात दोन्ही संघांनी अंतिम अकरात बदल केले. न्यूझीलंड संघात दोन बदल... टॉम ब्रूस आणि डॅरील मिचेल यांना संधी, कर्णधार केन विलियम्सन व कॉलीन डी ग्रँडहोमला विश्रांती दिली, तर भारतीय संघात तीन बदल - संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी संघात, तर रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली.
त्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन आणि लोकेश राहुल सलामीला आले. संजूनं खणखणीत षटकार खेचून आपल्या आगमनाची चाहूल दिली, पण पुढच्याच चेंडूवर तो माघारीही परतला. पुण्यातील ट्वेंटी-20 सामन्यातही षटकार अन् विकेट हेच पाहायला मिळाले होते. भारताला 14 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर लोकेश आणि कर्णधार विराट कोहली यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. लोकेश प्रचंड जबाबदारीनं खेळताना पाहायला मिळाला. या मालिकेत त्यानं सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखली. त्यानं ट्वेंटी-20 4000 धावांचा पल्ला पार केला.
पण, पाचव्या षटकात टीम बेन्नेटनं भारताला दुसरा धक्का दिला. पाचव्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर चौकार मारणाऱ्या कोहलीला त्यानं तिसऱ्या चेंडूवर चकवलं. मिचेल सँटनरनं तितक्याच खुबीनं कोहलीचा ( 11) झेल टिपला. दरम्यान या सामन्यात मिस यू धोनीचे फलक झळकलेले पाहायला मिळाले.
वर्ल्ड कपनंतर धोनी विश्रांतीवर
वर्ल्ड कपनंतर टीम इंडियानं वेस्ट इंडिज दौरा केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आदी संघांचा टीम इंडियानं सामना केला. यात एकाही मालिकेत भारताला हार मानावी लागली नाही. 10 जुलैनंतर भारतानं ट्वेंटी-20, वन डे आणि कसोटी अशा एकूण 12 मालिका खेळल्या आणि त्यापैकी 11 मालिका जिंकल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-20 मालिका बरोबरीत सुटली.
धोनीची कामगिरी
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
Web Title: IND Vs NZ, 4th T20I: Rishabh Pant and Sanju Samson fail, fans chant for MS Dhoni
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.