"लाव रे तो व्हिडिओ..."  विषय 'गंभीर', दोन दिवस खेळायला कुणीच नाही 'खंबीर'

टीम इंडियाचा नवा कोच हा आक्रमक शैलीतील आहे, ही गोष्ट वेगळी सांगण्याची गरज नाही. पण..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 04:20 PM2024-10-20T16:20:39+5:302024-10-20T17:05:05+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ Rohit Sharma Lead Team India Loss Bengaluru Test Against New Zealand Gautam Gambhir Approach Viral Video | "लाव रे तो व्हिडिओ..."  विषय 'गंभीर', दोन दिवस खेळायला कुणीच नाही 'खंबीर'

"लाव रे तो व्हिडिओ..."  विषय 'गंभीर', दोन दिवस खेळायला कुणीच नाही 'खंबीर'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

घरच्या मैदानात पाहुण्या संघाला पराभवाचं पाणी पाजून 'पाहुणचार' करणाऱ्या टीम इंडियाला किवी संघांन अगदी खिंडीत पकडलं. तब्बल ३६ वर्षांनी भारतात कसोटी सामना जिंकत टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा संघ आता मालिका जिंकण्याची स्वप्न बघू लागला असेल. बंगळुरु कसोटीतील दुसऱ्या दिवशीच्या खेळात भारतीय संघाचा पहिला डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. इथंच टीम इंडिया खऱ्या अर्थानं मागे पडली होती. रोहित शर्मानं पुढे येऊन चूक मान्यही केली. दुसऱ्या डावात आघाडीच्या अन् मध्य फळीतील फलंदाजांनी चांगली खेळी करत टीम इंडियाला या सामन्यात सुपर कमबॅक करणार असा सीन निर्माण केला पण सर्फराज खान आणि रिषभ पंत माघारी फिरल्यावर टीम इंडियाचा डाव पुन्हा गडबडला. लोअर मिडल ऑर्डरमधील डाव फसला अन् टीम इंडिया गोत्यात आली. पराभव हा नेहमी काहीतरी शिकवणारा असतो. पण टीम इंडियाचा हा पराभव 'गंभीर' प्रश्न उपस्थित करणारा आहे.

एका दिवसांत ४०० धावा अन् दोन दिवस खेळण्याची क्षमता 

मॉडर्न क्रिकेटच्या जमान्यात पारंपरिक कसोटी आपण वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जातोय. ही गोष्ट खुद्द गौतम गंभीरनं बोलून दाखवली होती. कसोटी क्रिकेटमधील अप्रोचबद्दल बोलताना गंभीर म्हणाला होता की, एका दिवसांत ४०० धावा करण्यासोबत दोन दिवस खेळून  मॅच ड्रॉ करण्याची क्षमता असणारे खेळाडू आमच्या ताफ्यात आहेत. कानपूरमध्ये टीम इंडियानं जे करून दाखवलं तो सीन गंभीर वक्तव्याच्या व्हायरल व्हिडिओमधील पहिला भाग होता. जो सुपरहिट ठरला. पण दोन दिवस थांबण्याची क्षमता दाखवण्याची वेळ आली असताना टीम इंडिया गडबडली. त्यामुळे दोन दिवस खेळण्याचा मुद्दा कुणीच गांभीर्यानं घेतल्याचे दिसत नाही, असा सीन पाहायला मिळाला.

'गंभीर' प्रश्न सोडवण्यासाठी कोणीच दिसलं नाही 'खंबीर'

भारतीय प्रशिक्षक ज्या तोऱ्यात बोलला अन् त्यानंतर टीम इंडियाची जी अवस्था झाली ते पाहिल्यावर पुन्हा पुन्हा त्याचे ते बोल आठवू लागतात. भारतीय संघाची बिकट अवस्था झाल्यावर नेटकऱ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून गंभीरला ट्रोलही केले आहे. त्यामुळेच बंगळुरुचा निकाल लागल्यावर "लाव रे तो व्हिडिओ..." असं म्हणत बंगळुरु कसोटीत कुठं होते ते दोन दिवस मैदानात नांगर टाकण्याची क्षमता असणारे खेळाडू? असा प्रश्न उपस्थित होतो. याचं उत्तर कोण देणार? हा प्रश्न तर आणखी 'गंभीर' आहे. कारण यातील एक नाव तर पुढच्या टेस्टमधून गायबही होईल. तो चेहरा म्हणजे लोकेश राहुल. टीम इंडियाच्या अप्रोचमुळे तो निम्मा कन्फूज झालाय असं वाटतं. मारून खेळावं की थांबून, हेच त्याला कळेना झालाय. या कात्रीत सापडल्यामुळे आता त्याच्यावर आउट होण्याची वेळ येणार असल्याचे दिसून येते. 

WTC फायनलसाठी लंडनचं फ्लाइट चुकणार?

टीम इंडियाचा नवा कोच हा आक्रमक शैलीतील आहे, ही गोष्ट वेगळी सांगण्याची गरज नाही. पण त्याचा तो व्हायरल व्हिडिओ पाहिला की हिंदी सिनेसृष्टीतील सनी देओलच्या 'इंडियन' चित्रपटातील गाजलेला डायलॉग आठवतो. "हम गांधीजी को भी पुजते है और चंद्रशेखर आझाद को भी.." गौतम गंभीर अगदी याच तोऱ्यात बोलला होता. बंगळुरुमध्ये संयम दाखवण्याची गरज होती त्यावेळी एकालाही गंभीर खेळी करून मैदानात तग धरावा असं वाटलं नाही. प्रत्येक संघ हा जिंकायच्या इराद्यानेच मैदानात उतरतो. हाच अप्रोच हवा पण वेळप्रसंगी संयम दाखवला नाही तर बंगळुरुची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होणार अन् त्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी लंडनला जाणारं विमान चुकणार, असा सीन निर्माण होऊ शकतो.

Web Title: IND vs NZ Rohit Sharma Lead Team India Loss Bengaluru Test Against New Zealand Gautam Gambhir Approach Viral Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.