Tilak Varma Marco Jansen, IND vs SA 3rd T20 Video: दक्षिण आफ्रिका विरुद्धची तिसरी T20 भारतीय संघाने अत्यंत रोमहर्षकपणे जिंकली. तिलक वर्माने ठोकलेल्या दमदार शतकामुळे भारताने द्विशतकी मजल मारली होती. या आव्हानाचे पाठलाग करताना अठराव्या षटकापर्यंत सामना भारताच्या मुठीत होता. शेवटच्या दोन षटकात ५१ धावांची गरज असताना आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को यान्सेन याने भारतीय गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. पण येथेही तिलक वर्माच्या एका 'आयडिया'मुळे भारताला सामना जिंकायला मदत झाली. तिलक वर्माच्या या कृतीने अनेकांना भारत-आफ्रिका T20 World Cup Final मधील रिषभ पंतची आठवण करून दिली.
नेमके काय घडले?
१२ चेंडूत ५१ धावांची गरज असताना हार्दिक पांड्या गोलंदाजीला आला. त्याच्या षटकात मार्को ने तीन चौकार आणि दोन षटकारांसह २६ धावा ठोकल्या. त्यामुळे शेवटच्या षटकात आफ्रिकेला विजयासाठी २५ धावांची आवश्यकता होती. अर्शदीपने शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव दिली. त्यामुळे मार्को पुन्हा स्ट्राइकवर आला. दुसऱ्या चेंडूवर मार्कोने लगावलेला षटकार तिलक वर्माच्या हाताजवळून गेला. हा षटकार अडवण्याचा प्रयत्न करताना तिलक वर्मा मैदानावर कोसळला आणि त्याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. मार्को फटकेबाजीच्या मूडमध्ये असतानाच तिलक वर्माची किरकोळ दुखापत पाहण्यासाठी आधी संघाचे फिजीओ मैदानात आले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि मग हार्दिक पांड्या यांनीही त्याच्या दुखापतीची जवळ जाऊन चौकशी केली. या साऱ्या घडामोडींमध्ये सुमारे चार ते पाच मिनिटांचा काळ गेला. त्यामुळे मार्कोची फटकेबाजी तुटली आणि पुढल्या चेंडूवर फटका हुकल्यामुळे मार्को LBW झाला.
अनेकांना आठवला रिषभ पंत
भारत आणि आफ्रिका यांच्यातील T20 World Cup 2024 चा फायनलचा सामना सुरू असताना असाच एक प्रकार घडला होता. आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन तुफान फटकेबाजीच्या मूडमध्ये होता. त्याला रोखणे जवळपास अशक्यच वाटत होते. अक्षर पटेलच्या चौदाव्या षटकात त्याने २६ धावा लुटल्या होत्या. त्यानंतर पंतने किरकोळ दुखापतीसाठी मैदानात एक ब्रेक घेतला होता. त्यामुळे क्लासेनची लय बिघडली आणि पुढल्या चेंडूवर तो झेलबाद झाला. तेथून संपूर्ण सामना फिरला आणि भारताला विश्वविजेतेपदाचा मार्ग सुकर झाला. या घटनेचा उल्लेख तेव्हाचा कर्णधार रोहित शर्मा यानेही एका मुलाखतीत केलेला आहे.
दरम्यान, भारताने हा सामना जिंकल्यामुळे मालिकेत दोन एक अशी आघाडी घेतली आहे आता मालिकेतील शेवटचा सामना शिल्लक असल्याने आफ्रिकेला मालिका जिंकता येऊ शकत नाही ते केवळ मालिका बरोबरीत सोडवू शकतात पण भारताने शेवटचा सामना जिंकल्यास भारताला मालिका विजयाची संधी आहे.
Web Title: IND vs SA 3rd T20 Tilak Varma stopped play due to head injury breaks momentum of Marco Jansen and Arshdeep took his wicket watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.