ब्रिस्बेन: पहिल्या कसोटीत अवघ्या ३६ धावांत गारद झाल्यानंतर भारतीय संघाचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे आलं. त्यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर नमवेल, अशी कल्पनादेखील कोणी केली नसेल. कर्णधार विराट कोहली मायदेशी परतलेला, संघ दुखापतींनी ग्रासलेला अशा परिस्थितीत रहाणेनं संघाची धुरा हाती घेतली आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. दुसरी आणि चौथी कसोटी जिंकत रहाणेच्या संघानं भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नाही, हा संदेश दिला.
३६ धावांत गारद झालेला संघ ऑस्ट्रेलियाला कसा भारी पडला; खुद्द रहाणेनंच 'मास्टरप्लान' सांगितला
अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अजिंक्यच राहतो, हा इतिहास आहे. पण ऍडलेडमध्ये भारतीय संघानं अवघ्या ३६ धावांत लोटांगण घातल्यानं यंदा बॉर्डर-गावसकर चषक ऑस्ट्रेलियाकडे जाणार असं वाटू लागलं. त्यातच विराट कोहली पत्नीच्या बाळंतपणासाठी माघारी परतल्यानं संघासमोरच्या अडचणी वाढल्या. काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानं समस्यांमध्ये भर पडली. या आव्हानात्मक परिस्थितीत अजिंक्यनं दुसऱ्या कसोटीत कर्णधाराला साजेशी शतकी खेळी केली आणि कसोटी सामना संघाला जिंकून दिला.
ना कोरोनाचा बहाणा...ना स्लेजिंगचा हातखंडा...टीम इंडियानं असा रोवला विजयाचा झेंडा!
तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ पिछाडीवर पडला. ऑस्ट्रेलियानं ४०७ धावांचं अवघड आव्हान भारतासमोर ठेवलं. पण भारताच्या सर्व फलंदाजांनी चिवट झुंज दिली. त्यामुळे सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. ही कसोटी अनिर्णित राखण्यात मोलाची भूमिका बजावणारा हनुमा विहारी दुखापतीमुळे जायबंदी झाला होता. याशिवाय अष्टपैलू रविंद्र जाडेजा आणि भरवशाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहदेखील चौथ्या आणि निर्णायक कसोटीत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं.
सौ शहरी, एक संगमनेरी... टीम इंडियाच्या 'अजिंक्य' विजयावर काँग्रेस नेत्याचं ट्वीट
चौथ्या कसोटीआधी अजिंक्यचं वडील मधुकर रहाणेंसोबत बोलणं झालं. वडिलांनी अजिंक्यला एक गोष्ट मेसेज केली. बाजीप्रभू देशपांडेंनी प्राणाची बाजी लावत खिंड लढवली होती. हाताशी असलेल्या मावळ्यांसोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले होते, ही गोष्ट अजिंक्यला बाबांनी पाठवली होती. अजिंक्यनं यातून योग्य तो बोध घेत फारसा अनुभव गाठिशी नसलेल्या खेळाडूंना आत्मविश्वास दिला. या खेळाडूंनी बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला जोरदार टक्कर दिली. ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियन संघ गेल्या ३२ वर्षांपासून अजिंक्य होता. या मैदानात भारतीय संघ कधीही जिंकलेला नाही, हा इतिहास होता. मात्र अजिंक्यच्या शिलेदारांनी याच मैदानात ऑस्ट्रेलियाला पाणी पाजत नवा इतिहास लिहिला. चौथ्या डावात, सामन्याच्या पाचव्या दिवशी आव्हानात्मक स्थितीत ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग करत कसोटीसह मालिकादेखील खिशात घातली.
Web Title: India vs Australia 4th Test ajinkya rahanes father shares conversation before brisbane sydney test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.