भारत विरुद्ध बांगलादेश ट्वेंटी-20 मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आली आहे. रोहित शर्माच्या तुफानी 85 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या ट्वेंटी-20त सहज विजय मिळवला. बांगलादेशचे 154 धावांचे लक्ष्य भारतानं 15.4 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. रोहितनं 43 चेंडूंत 6 चौकार व 6 षटकार खेचून 85 धावा चोपल्या. या सामन्यात रोहितनं अनेक विक्रमांना गवसणी घातली. रोहितच्या या खेळीचं अनेक मान्यवरांनी कौतुक केलं. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानं तर रोहितची तुलना दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरशी केली. शिवाय रोहितला जे जमतं ते विराट कोहलीला कधीच जमणार नाही, असा दावाही वीरूनं केला.
बांगलादेशनं लिटन दास ( 29), मोहम्मद नईम ( 36), सौम्या सरकार ( 30) आणि कर्णधार महमदुल्लाह (30) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर 6 बाद 153 धावा केल्या. प्रत्युत्तरात रोहित व शिखर धवन यांनी 118 धावांची भागीदारी करताना विक्रमाची नोंद केली. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 4 वेळा शतकी भागीदारीचा विक्रम रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीनं नावावर केला. त्यांनी डेव्हिड वॉर्नर- शेन वॉटसन, मार्टिन गुप्तील-केन विलियम्सन आणि रोहित-विराट कोहली यांचा 3 शतकी भागीदारीचा विक्रम मोडला.
रोहितच्या या खेळीबद्दल वीरू म्हणाला,'' एका षटकात 3-4 षटकार खेचणे किंवा 45 चेंडूंत 80-90 धावा करणे ही एक कला आहे. रोहितनं अशी कामगिरी अनेकदा केली आहे. पण, विराट कोहलीकडून असा खेळ सातत्यानं पाहायला मिळालेला नाही. रोहित हा सचिन तेंडुलकरसारखाच आहे.''
'तो' प्रसंग कॅमेरात कैद झाल्यानंतर रोहित शर्मा म्हणतो...
या सामन्यात रोहितनं अनेक विक्रमांना गवसणी घातली, परंतु त्याची एक कृती काल दिवसभर चर्चेत राहिली. रोहितनं तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर नाराजी प्रकट करताना चक्क शिवी दिली. त्याचे हे कृत्य कॅमेरात कैद झाले. त्यामुळे त्याच्यावर आता कारवाई होईल का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण, सामन्यानंतर रोहितला जेव्हा याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर मजेशीर आहे.
13व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पंतनं सौम्या सरकारला यष्टिचीत केले. पण, तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिला आणि सुरुवातीला नाबाद असा निर्णय दिला. पण, त्यांना ही चूक लक्षात येताच त्यांनी निर्णय मागे घेत सरकारला बाद दिले. पंचांच्या या चुकीवर रोहित भडकला आणि शिव्या दिल्या. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला...
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला,''मैदानावर मी खूप भावनिक होतो. परिस्थिती कशीही असो, आपले लक्ष्य पूर्ण करण्याचा माझा निर्धार असतो. युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चतुर गोलंदाजी केली. त्यांच्याकडे बऱ्याच स्थानिक आणि आयपीएल सामन्यांच्या अनुभव आहे. त्या प्रकाराबद्दल विचाराल तर, पुढच्या वेळी कॅमेरा कुठेय हे पाहूनच मी व्यक्त होईन ( उत्तर दिल्यानंतर हसला).''
Web Title: India vs Bangladesh, 2nd T20I : Virender Sehwag compares Rohit Sharma to Sachin Tendulkar, says 'even Virat Kohli can't do what Hitman does'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.