India vs England, 3rd ODI, Pune: भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील आजच्या निर्णायक सामन्याची नाणेफेक पुन्हा एकदा इंग्लंडनं जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याही सामन्यात भारतीय संघाला पुन्हा एकदा फलंदाजी करुन मोठी धावसंख्या पाहुण्यांसमोर उभारावी लागणार आहे. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर भारतीय संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे.
भारतीय संघात फिरकीपटू कुलदीप यादव याला आराम देऊन आणखी एका वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. टी-२० सामन्यात भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या टी.नटराजन याला आजच्या निर्णायक लढतीसाठी भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघात एक फिरकीपटू कमी करुन त्याजागी वेगवान गोलंदाजाला संधी देण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादवची कामगिरी निराशाजनक राहिली होती. त्यामुळे कुलदीपच्या जागी संघात यजुवेंद चहलचं पुनरागमन होईल अशी चर्चा होती. पण चहलला संधी न देता टीम इंडियानं टी.नटराजनला संघात जागा दिली आहे.
कोहलीच्या नेतृत्वात २०० वा सामना
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळविला जाणारा हा २०० वा क्रिकेट सामना ठरणार आहे. याआधी महेंद्रसिंग धोनीनं सर्वाधिक ३३२ सामन्यांत, तर मोहम्मद अझरुद्दीन यांनी २२१ सामन्यांत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा टीम इंडियाचं नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत आता विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सौरव गांगुली १९५ सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे.
असा असेल भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा, टी. नटराजन
Web Title: india vs england 3rd odi check out indias playing xi T Natarajan got chance in team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.