Join us  

Semi Final च्या लढतीपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का! ICC च्या घोषणेनं वाढलं टेंशन 

भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत गुरुवारी इंग्लंडचा सामना करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 4:09 PM

Open in App

भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत गुरुवारी इंग्लंडचा सामना करणार आहे. या सामन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) केलेल्या घोषणेनं टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याला धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादवने आयसीसी ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीतील अव्वल स्थान गमावले आहे. डिसेंबर २०२३ पासून तो या अव्वल स्थानावर विराजमान होता, परंतु आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत त्याची घसरण झाली आहे. 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून ऑस्ट्रेलियाचा संघ सुपर ८ मधून बाहेर पडला असला तरी ट्रॅव्हिस हेडने मोठी झेप घेतली. तो ट्वेंटी-२०तील नंबर वन फलंदाज बनला आहे. भारताविरुद्धच्या सुपर ८मधील शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने ७६ धावांची खेळी केली होती, परंतु संघाला विजय मिळवून देण्यात तो असमर्थ राहिला. ट्रॅव्हिस हेडने चार स्थानांची झेप घेताना, सूर्यकुमार यादव, फिल सॉल्ट, बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांना मागे टाकून अव्वल स्थान पटकावले. वेस्ट इंडिजचा जॉन्सन चार्ल्स हा टॉप टेनमध्ये आलेला नवा खेळाडू ठरला. अफगाणिस्तानचा रहमनुल्लाह गुरबाज पाच स्थानांच्या सुधारणेसह ११व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हेड अव्वल स्थानावर आला असताना ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर मार्कस स्टॉयनिसला अव्वल स्थान गमवावे लागले आणि तो चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. भारताचा हार्दिक पांड्या चार स्थान वर सरकून तिसऱ्या, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा नंबर वन ऑल राऊंडर बनला आहे. वेस्ट इंडिजच्या रोस्टन चेसने १७ स्थानांची भरारी घेताना १२ वा क्रमांक पटकावला आहे. 

इंग्लंडचा आदिल राशिद हा गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे, परंतु अफगाणिस्तानचा राशिद खान दमदार कामगिरी करून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड ३ स्थानांच्या सुधारणेसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.  

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024