IPL 2021, Delhi Capitals Vs Rajasthan Royals Live Updates : महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाचे धडे गिरवत असलेल्या रिषभ पंतनं आज दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला. दिल्ली कॅपिटल्सच्या १५४ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं नव्यानं दाखल करून घेतलेले तगडे स्टार अपयशी ठरले. दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना RRला एकेका धावेसाठी संघर्ष करायला लावला आणि त्यात RRनं विकेट फेकल्या. दिल्लीनं हा सामना जिंकून गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावताना प्ले ऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित केला.
राजस्थान रॉयल्सच्या युवा गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या तगड्या फलंदाजांना जखडून ठेवले. शिखर धवन व पृथ्वी शॉ अपयशी ठरल्यानंतर रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांनी संघर्ष केला, परंतु RRच्या कर्णधारानं गोलंदाजांचा सुरेख वापर करताना DCला मोठा पल्ला गाठू दिला नाही. मुस्ताफिजूर रहमान ( २-२२) व चेतन सकारिया ( २-३३) यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या असल्या तरी कार्तिक त्यागी ( १-४०), तबरेज शम्सी व राहुल तेवाटिया ( १-१७) यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली. दिल्लीला २० षटकांत ६ बाद १५४ धावांपर्यंत मजल मारता आली.
दिल्लीचे दोन्ही सलामीवीर २१ धावांवर माघारी परतले. कर्णधार रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांनी संयमी खेळ करताना संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. रिषभ-श्रेयस यांनी ६२ धावांची भागीदारी केली. रिषभ २४ धावांवर माघारी परतला, तर अय्यरनं ३२ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ४३ धावा केल्या. शिमरोन हेटमायरनं १६ चेंडूंत २८ धावा करताना दिल्लीच्या आशा पल्लवीत केल्या, परंतु रहमाननं चतुराईनं त्याची विकेट घेतली.
दिल्ली कॅपिटल्सच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. लाएम लिव्हिंगस्टोन ( १), यशस्वी जैस्वाल ( ५) व डेव्हिड मिलर ( ७) हे धावफलकावर १७ धावा असताना माघारी परतले. आवेश खाननं पहिल्याच षटकात राजस्थानला धक्का देताना लिव्हिंगस्टोनला यष्टिरक्षक रिषभकरवी झेलबाद केलं. त्यानंतर अॅनरीच नॉर्ट्जेनं जैस्वालची विकेट घेतली. लगेच DCनं आर अश्विनला बोलावले अन् त्यानं पहिल्याच षटकात मिलरची विकेट घेत ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २५० विकेट्स घेण्याचा विक्रम केला. अमित मिश्रा व पियूष चावला यांच्या नावावर प्रत्येकी २६२ विकेट्स आहेत आणि या क्लबमध्ये अश्विन ( २५०*) आला आहे.
महिपाल लोम्रोर काही काळ कर्णधार संजू सॅमसनसोबत खेळपट्टीवर चिकटला होता, परंतु कागिसो रबाडानं त्याची ( १९) विकेट घेतली. रियान पराग ( २) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. राजस्थानचा निम्मा संघ ५५ धावांवर माघारी परतल्यानं धावा व चेंडू यांच्यातील अंतर प्रचंड वाढले होते आणि संजू सॅमसनवर आता सर्व भीस्त होती. पण, अखेरच्या ४ षटकांत RR ला अशक्यप्राय ६४ धावा करायच्या होत्या. सॅमसननं प्रयत्न केले, परंतु तो RRला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. सॅमसन ५३ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ७० धावांवर नाबाद राहिला. राजस्थानला ६ बाद १२१ धावा करता आल्या अन् दिल्लीनं ३३ धावांनी सामना जिंकला.
Web Title: IPL 2021, DC vs RR Live Updates : Delhi Capitals beat Rajasthan Royals by 33 runs & become a table topper
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.