Pahalgam Terrorist Attack Updates, IPL 2025 Mumbai Indians vs SRH: काश्मीर खोऱ्यातील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना गोळ्या घालून मारले. पर्यटकांना आधी नाव आणि धर्म विचारण्यात आला. त्यानंतर त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वजण आपापल्या परीने मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. त्यातच भारतीय क्रिकेट जगतात सुरू असलेल्या IPL 2025 स्पर्धेतही दंडावर काळ्या पट्ट्या बांधून ( Black Armbands ) या हल्ल्याचा निषेध करण्यात येणार आहे.
IPL सामन्यात केला जाणार निषेध
स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळला जाणार आहे. हैदराबादच्या स्टेडियममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात सर्व खेळाडू, स्टाफ मेंबर्स आणि पंच दंडाला काळ्या फिती बांधून मैदानात उतरणार आहेत आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध करणार आहेत. याशिवाय आजच्या सामन्यात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार नाही. तसेच चीअरलीडर्स देखील नृत्यकला सादर करणार नाहीत. थोडक्यात म्हणजे आजच्या सामन्यात कुठल्याही प्रकारच्या जल्लोष केला जाणार नाही. त्यासह सामना सुरू होण्याआधी एका मिनिटाचे मौन पाळले जाणार आहे.
दरम्यान, या हल्ल्यानंतर हायलेव्हल बैठक घेण्यात आली. केंद्र सरकारचे गृहमंत्री अमित शाह आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीत होते. सरकारने सैन्याला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सौदीवरून परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेबाबत विविध अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. त्यातच सुरुवातीच्या तपासात गुप्तचर यंत्रणांनी पहलगामचे दहशतवादी भारतात कुठून घुसले याचा शोध घेतला आहे. पीर पंजालच्या डोंगराळ भागातून हे दहशतवादी भारतात आले. त्यानंतर राजौरीवरून चत्रु, मग वधावनमार्गे ते पहलगामपर्यंत पोहचले असं तपासात समोर आले.
Web Title: IPL 2025 Mumbai Indians SRH players umpires to wear black armbands to pay homage to Pahalgam terror attack victims
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.