Rishabh Pant Lucknow Super Giants, Most Expensive Player, IPL Auction 2025 Live: गेल्या आठवड्याभरापासून अनेक क्रिकेट जाणकार आणि तज्ज्ञ मंडळी लावत असलेला अंदाज आज खरा ठरला. दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलेल्या तडाखेबाज रिषभ पंतला IPL च्या इतिहासातील सर्वात महागडी बोली लागली. लखनौ सुपर जायंट्स संघाने रिषभ पंतला २७ कोटी रुपयांच्या बोलीसह संघात घेतले. बोली लावण्याची प्रक्रिया २२ कोटी ५० लाख रुपयांना थांबली होती. त्यानंतर दिल्लीने RTM कार्ड वापरण्याची इच्छा व्यक्त केली. त्यात लखनौ संघाने अंतिम बोली २७ कोटी रुपयांची असल्याचे सांगितले. त्यावर दिल्लीने माघार घेतली आणि अखेर रिषभ पंत दिल्लीतून लखनौ संघात पोहोचला.
अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला!
लिलावाला सुरुवात होताच सर्व क्रिकेटरसिकांचे लक्ष श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत या दोघांच्या बोलीकडे होते. अपेक्षेप्रमाणे या बोली तुफान रंगतदार ठरल्या. आधी श्रेयस अय्यरचे नाव बोलीसाठी घोषित झाले. टीम इंडियात कमबॅकसाठी धडपडणारा आणि गेल्या वर्षी कोलकाता नाइट रायडर्स संघाला विजेतेपदाची ट्रॉफी मिळवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यरवर पैशांचा पाऊस पडला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करून दाखवणाऱ्या श्रेयस अय्यरला मेगा लिलावात मोठी लॉटरी लागली. पंजाब किंग्ज संघाने तब्बल २६ कोटी ७५ लाखांची बोली लावत श्रेयस अय्यरला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. IPL इतिहासातील श्रेयस अय्यर हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांनी पंतवर बोली लावण्यात आली. पंतला अय्यरपेक्षा २५ लाख रुपये जास्त मिळाल्याने रिषभ पंत महागडा खेळाडू ठरला.
दरम्यान, रिषभ पंतला संघात घेणारा लखनौ सुपर जायंट्स संघ लिलावात पाच खेळाडूंसह उतरला होता. त्यांनी वेस्टइंडीजचा तुफानी फलंदाज निकोलस पूरन याला २१ कोटींच्या मोठ्या रकमेसह संघात रिटेन केले. त्या पाठोपाठ रवी बिश्नोई आणि मयंक यादव या दोन भारतीय गोलंदाजांना प्रत्येकी ११ कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवले. तर मोहसीन खान आणि आयुष बडोनी या अनकॅप्ड खेळाडूंना प्रत्येकी ४-४ कोटींना करारबद्ध केले.
आगामी IPL हंगामासाठी यंदाच्या लिलावात एकूण ५७७ खेळाडूंचे भवितव्य ठरत आहे. ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रत्येक संघाला आपल्या संघातील कायम ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेले खेळाडू सांगायचे होते. त्यानुसार, १० संघांनी मिळून एकूण ४६ खेळाडूंन संघात कायम ठेवले. आता १० संघांसाठी ५७७ पैकी एकूण २०४ जागा शिल्लक आहेत. त्यामुळे अनेक मोठ्या बोली लावल्या जाऊ शकतात. तसेच, काही खेळाडू अनपेक्षितपणे ‘अनसोल्ड’ म्हणजेच न विकलेलेच राहण्याचीही शक्यता आहे. २४ आणि २५ असे दोन दिवस हा मेगालिलाव सुरु आहे.
Web Title: IPL Auction 2025 Historical bidding for Rishabh Pant as History changed in just 15 minutes he became most expensive player of IPL History to LSG overtakes Shreays Iyer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.