वेस्ट इंडिज संघानं चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. कर्णधार किरॉन पोलार्डच्या नाबाद ५१ धावा, ड्वेन ब्रोव्होच्या १९ धावांत ४ विकेट्स आणि ख्रिस गेलनं घेतलेली एक विकेट व दोन झेलच्या जोरावर विंडीजनं २१ धावांनी हा सामना जिंकला. वेस्ट इंडिजच्या ६ बाद १६७ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेला ९ बाद १४६ धावा करता आल्या.
धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात ख्रिस गेलनं आफ्रिकेचा सलामीवीर रिझा हेंड्रिक्सला बाद केले. ही विकेट घेतल्यानंतर ४२ वर्षीय ख्रिस गेलनं मजेशीर सेलिब्रेशन केलं. कर्णधार टेम्बा बवुमा ( ७), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( ६), डेव्हिड मिलर ( १२), जॉर्ज लिंडे ( ६) यांना अपयश आले. क्विंटन डी कॉकने ४३ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६० धावा केल्या. ड्वेन ब्राव्होनं १९ धावांत ४ विकेट्स घेतल्या. आंद्रे रसेलनं ३० धावांत २ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, विंडीजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एव्हीन लुईस ( ७), ख्रिस गेल ( ५), शिमरोन हेटमायर ( ७) ही मधली फळी अपयशी ठरल्यानंतर लेंडल सिमन्स व
किरॉन पोलार्ड यांनी दमदार खेळी केली. सिमन्स ३४ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावांवर माघारी परतला. पोलार्डनं २५ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ५१ धावा कुटल्या आणि संघाला १६७ धावांपर्यंत मजल मारून दिली.
Web Title: Kieron Pollard 51*, Dwayne Bravo four-for help West Indies keep series alive
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.