MI vs DC Latest News: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात सातत्य राखणारे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघांदरम्यान आज चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. दिल्लीच्या संघात असलेले मुंबईकर पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे अपयशी ठरल्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी MIच्या गोलंदाजांचा सामना केला. गब्बरनं अर्धशतकी खेळी करताना दिल्लीला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पण, मुंबई इंडियन्सची ( MI) घोडदौड रोखण्यासाठी हा पल्ला पुरेसा ठरला नाही. क्विंटन डी' कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. मुंबईनं विजयासह गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावलं.
दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीनं अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) व अॅलेक्स केरी यांना स्थान दिले. प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीला साजेशी सुरुवात करता आली नाही. ट्रेंट बोल्टनं तिसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ ( ४) याला बाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) खेळपट्टीवर आला. त्याने काही सुरेख फटके मारताना क्लास दाखवला, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. रहाणेला पाचव्या षटकात कृणाल पांड्यानं १५ धावांवर पायचीत केलं.
शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी दिल्लीचा डाव सावरला. यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. कृणाल पांड्यानं दिल्लीला आणखी एक धक्का देत अय्यरला ( ४२) बाद केले. धवननं ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. धवनचे हे IPLमधील ३८वे अर्धशतक ठरले आणि त्यानं सुरेश रैना, रोहित शर्मा व विराट कोहली ( प्रत्येकी ३८ अर्धशतकं ) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. धवनने ५२ चेंडूंत १ षटकार व ६ चौकारांसह नाबाद ६९ धावा केल्या. दिल्लीनं २० षटकांत ४ बाद १६२ धावा केल्या.
प्रत्युत्तरात रोहित शर्मा ( ५) लगेच माघारी परतला तरी क्विंटन डी'कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दिल्लीच्या गोलंदाजांना धु धु धुतले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. आर अश्विननं ही भागीदारी तोडली. क्विंटन ३६ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर माघारी परतला. क्विंटन बाद होण्यापूर्वी आधीच्या चेंडूवर अश्विननं यादवचा सोपा झेल सोडला होता. त्यानंतर यादव आणि इशान शर्मा यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. कागिसो रबाडानं १५व्या षटकात मुंबईला धक्का दिला. यादव ३२ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ५३ धावांत माघारी परतला. बर्थ डे बॉय हार्दिक पांड्या भोपळा न फोडताच मार्कस स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर माघारी परतला.
त्याचा सामन्यावर फार फरक पडला नाही. किरॉन पोलार्ड आणि इशान किशन यांनी मुंबईला विजय मिळवून दिला. इशान १५ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून २८ धावांवर माघारी परतला. मुंबई इंडियन्सनं हा सामना ५ विकेट्स राखून जिंकला. विजयासाठी अखेरच्या षटकात ७ धावांची गरज असताना कृणाल पांड्यानं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला. दुसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉनं रन आऊटची संधी सोडली.
Web Title: MI vs DC Latest News: Mumbai Indians win by 5 wickets, go top on IPL 2020 Point Table
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.