इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन ( Michael Vaughan) आणि भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर ( Wasim Jaffer) यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक द्वंद्व रंगलेलं पाहायला मिळालं. विराट कोहलीच्या प्रगतीवर जळणाऱ्या वॉननं न्यूझीलंडचा केन विलियम्सन हा जगातील सर्वोत्तम खेळाडू असल्याचं मत मांडलं होतं. त्यावरून जाफरनं त्याच्या मिश्कील शैलीत वॉनचा समाचार घेतला.
वॉनला सुनावताना जाफरनं बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा सहारा घेतला. हृतिकच्या एका हाता अतिरिक्त बोट आहे आणि त्यावरूनच जाफरनं इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा समाचार घेतला. जाफरनं ट्विट केलं की, एक्स्ट्रा उंगली हृतिक के पास है, पर करता मायकल वॉन है ( हृतिक रोशनकडे अतिरिक्त बोट आहे, परंतु मायकल वॉन काड्या करतोय).
जाफरनं नक्की काय म्हटलंय हे वॉनला कळलं नाही आणि त्यानं ट्विट केलं की, वासिम माझ्या मताशी सहमत आहे, असे मी गृहित धरतो.
काय म्हणाला होता वॉन?
वॉननं याआधीही भारतीय क्रिकेट आणि खेळाडूंवर टीका केली आहे. तो म्हणाला,''जर केन विलियम्सन भारतीय असता तर तो जगातील सर्वोत्तम खेळाडू असता. पण, विराट कोहली असताना असं कुणीच बोलणार नाही. कारण, केन भारतीय नाही. भारताचा कर्णधार सोशल मीडियावर फेमस आहे आणि त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. इंस्टाग्रामवर त्याचे १०० मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.''
''मी न्यूझीलंडमध्ये आहे, म्हणून हा दावा करत नाही. केन विलियम्सन तीनही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम आहे. पण, सोशल मीडियावर त्याचे विराट एवढे फॉलोअर्स नाहीत म्हणून त्याची बरोबरी होऊ शकत नाही. विराट दरवर्षी जाहिरातीतूनही प्रचंड पैसा कमावतोय. पण, क्वालिटी क्रिकेट व सातत्याचा विचार केल्यास केन विलियम्सन हा वरचढ ठरतो. आशा करतो की जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये तो विराटपेक्षा अधिक धावा करेल,''असेही तो म्हणाला.
Web Title: Michael Vaughan engages in a hilarious banter with Wasim Jaffer over the former’s comment on Kane Williamson
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.