शुक्रवारी ईदचा ( EID) सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला गेला. विराट कोहली, हरभजन सिंग, सुरेश रैना यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरून ईदच्या शुभेच्छा दिल्या. भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) यानंही ईदच्या शुभेच्छा दिल्या, परंतु या आनंदाच्या क्षणात तो भावुक झालेला दिसला. वडिलांच्या निधनानंतर हा पहिलाच ईदचा सण होता आणि त्यांच्या आठवणीनं त्याचे डोळे पाणावले होते.
सिराजनं पोस्ट केलेल्या फोटोत त्याच्यासह आई व भाऊ दिसत आहे. त्यानं त्याचपोस्टमध्ये आणखी एक फोटो अपलोड केला आणि त्यात तो त्याच्या वडिलांसह दिसत आहे. त्यानं लिहिलं की, ''ईद-उल-फितर मुबारक. आई-वडिलांची साथ असेल तर प्रत्येक दिवस हा ईद सारखाच असतो आणि तसं नसेल तर ईदचा दिवसही उदासीन वाटतो. मिस यू पापा!'' या पोस्टवर चाहते त्याचं सांत्वन करत आहेत.
मोहम्मद सिराज जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता, तेव्हा मायदेशात असलेल्या सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतरही सिराज टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खेळला. त्यानं 3 कसोटी सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या. गाबा कसोटीत त्यानं एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. मायदेशात परतताच तो थेट स्मशानभूमीत गेला अन् वडिलांच्या कबरीवर श्रद्धांजली वाहिली.
कोहलीच्या प्रेरणादायी शब्दांनी मला बळ लाभले - सिराज
वडिलांना गमावल्यानंतरही सिराजने ऑस्ट्रेलियात थांबण्यास प्राधान्य दिले. या कठीण स्थितीत कर्णधार कोहली आणि अन्य सहकाऱ्यांनी प्रेरणादायी शब्दांनी आपल्याला बळ दिल्याचा खुलासा सिराजने केला आहे.
विराट नेमका काय म्हणाला होता, हे सांगताना सिराजने सांगितले की, ‘तुझ्यात कुठल्याही प्रकारच्या खेळपट्टीवर फलंदाजाला बाद करण्याची क्षमता आहे. वडिलांच्या निधनामुळे मी हतबल झालो असताना, मला विराटने बळ दिले. हॉटेलच्या खोलीत मी रडत असताना विराटने माझ्याजवळ येत मला आलिंगन दिले. आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत, चिंता करू नकोस, असा धीर दिला. विराटच्या त्या शब्दांमुळे मला बळ मिळाले. माझे करिअर विराटमुळेच आहे.’
‘आयपीएलमधील सीएसके विरुद्धच्या सामन्यानंतर विराटने माझ्या गोलंदाजीचे कौतुक करीत, इंग्लंड दौऱ्यासाठी तयार राहण्याचे संकेत दिले होते. २० सदस्यांच्या संघात माझे नाव आहे. कर्णधाराच्या या शब्दांमुळे मला बळ मिळाले. शिवाय पुढे काहीतरी करू शकतो, याची प्रेरणा देखील लाभली,’ असे मत सिराजने व्यक्त केले.
Web Title: "Miss You Papa": Mohammed Siraj's Emotional Post On First Eid After Father's Death
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.