इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मध्ये ३ कोटी खर्च करून मुंबई इंडियन्सने ताफ्यात घेतलेल्या डेवॉल्ड ब्रेव्हिसने ( Dewald Brevis) आज कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2022) तुफान फटकेबाजी केली. Mumbai Indians ने १८ वर्षीय फलंदाजासाठी कोट्यवधी रक्कम का मोजले, याचे उत्तर त्याने पुन्हा एकदा आपल्या खेळीतून दिले. आयपीएल २०२२मध्ये ७ सामन्यांत १४२.४८च्या स्ट्राईक रेटने १६१ धावा करणारा ब्रेव्हिस CPL मध्ये धुमाकूळ घालतोय...
सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीअट्स ( St Kitts And Nevis Patriots) संघाचे प्रतिनिधित्व करताना ब्रेव्हिसने आज वादळी खेळी केली. एव्हिन लुईस ( १५), आंद्रे फ्लेचर ( २) व किसी कार्टी ( ५) हे अपयशी ठरले आणि त्रिनबागो नाइट रायडर्स ( Trinbago Knight Riders) च्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड घेतली. पण, शेर्फाने रुथरफोर्ड व डॅरेन ब्राव्हो यांनी डाव सावरला. ३ बाद २८ वरून त्यांनी सेंट किट्सना ९४ धावांपर्यंत नेले. ब्राव्हो २१ चेंडूंत २३ धावांवर बाद झाला. रुथरफोर्डने ५० चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ७८ धावांची खेळी केली. पण, ब्रेव्हिसने ६ चेंडूंत केलेली खेळी भाव खावून गेली. त्याने सहा चेंडूंत ०, ६,६,६,६,६ असे सलग पाच षटकार खेचून नाबाद ३० धावा करताना संघाला ६ बाद १६३ धावांपर्यंत पोहोचवले.
प्रत्युत्तरात किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या नाइट रायडर्सने १० षटकांत २ बाद ५६ धावा केल्या होत्या. पोलार्ड 31 धावा करून माघारी परतला. टीम सेईफर्टने ४७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५९ धावा केल्या. आंद्रे रसेलनेही १७ चेंडूंत २९ धावा केल्या, परंतु नाइट रायडर्सना ७ बाद १५६ धावांपर्यंतच मजल मारता आली. सेंट किट्सने ७ धावांनी हा सामना जिंकला. शेल्डन कोट्रेल ( ३-३३), केव्हिन सिक्लेअर ( २-१८) व ड्वेन ब्राव्हो ( २-४६) यांनी चांगली गोलंदाजी केली.
कोण आहे डेवॉल्ड ब्रेव्हिस?डेवॉल्ड ब्रेव्हिस ( Dewald Brevis ) हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. गतवर्षी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा या युवा फलंदाज सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. आयपीएल ऑक्शनमध्ये २० लाख मुळ किमतीच्या खेळाडूंमध्ये त्याने नाव नोंदवले होते आणि पंजाब किंग्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यात त्याच्यासाठी कडवी टक्कर पाहायला मिळाली, परंतु मुंबई इंडियन्सने एन्ट्री घेत युवा खेळाडूला ३ कोटींमध्ये आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
एबी डिव्हिलियर्सचा ( AB de Villiers) जबरा फॅन असलेला आणि त्याच्याचसारखी ३६० डिग्री फलंदाजी करणाऱ्या ब्रेव्हिसला त्याचे मित्र व सहकारी Baby AB नावाने बोलवतात.१८ वर्षीय ब्रेव्हिसने वेस्ट इंडिज येथे झालेल्या Under-19 World Cup स्पर्धेत त्याने ६ सामन्यात सर्वाधिक ५०६ धावा केल्या. त्यात दोन शतकांचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्यात त्याने भारताविरुद्ध ६५ धावांची खेळी केली. त्यानंतर यूगांडाविरुद्ध १०४ धावा ( ११० चेंडू) व २-१८ वि. यूगांडा, ९६ धावा ( १२२ चेंडू) वि. आयर्लंड, ९७ धावा ( ८८ चेंडू) व २-४० वि. इंग्लंड, ६ धावा व १-५२ वि. श्रीलंका आणि १३८ धावा वि. बांगलादेश अशी कामगिरी केली होती.